Sugarcane Farming: 70 वर्ष वयाच्या गुरुजींनी 50 गुंठ्यात घेतले 100 टन उसाचे उत्पादन! अशा पद्धतीने केले संपूर्ण नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming:- एखादी गोष्ट करण्याला किंवा जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करण्याला वयाचे बंधन नसते हे आपल्याला अनेक व्यक्तींच्या कार्यावरून दिसून येते. मनामध्ये असलेली प्रचंड जिद्द, ठरवलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करण्याची उर्मी असली तर वयाचे बंधन न येता माणूस सहजरित्या अशा गोष्टी पूर्ण करू शकतो. समाजामध्ये असे अनेक वयाची साठी पूर्ण केलेले व्यक्ती आपण बघतो की ते शेतामध्ये देखील तरुण मुलांना लाजवतील अशा पद्धतीने काम करतात.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण नेज या गावचे निवृत्त शिक्षक मलाप्पा बन्ने यांचे उदाहरण घेतले तर 50 गुंठ्यामध्ये 100 टन उसाचे उत्पादन घ्यायचे हे त्यांचे स्वप्न होते व आयुष्यात एकदा का होईना हे स्वप्न पूर्ण करायचे ही मनोमन त्यांची इच्छा होती व हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप पद्धतीने प्रयत्न केले व उसाचे नियोजन देखील तसेच केले. अगदी मोठ्या कष्टाने आणि नियोजनाने त्यांनी 50 गुंठ्यात 100 टन उसाचे उत्पादन घेण्याचे स्वप्न पूर्ण केले.

 निवृत्त शिक्षकाने घेतले 50 गुंठ्यात 100 टन उसाचे उत्पादन

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की नेज या गावचे निवृत्त शिक्षक मल्लाप्पा बन्ने यांचे स्वप्न होते की 50 गुंठे जमिनीच्या तुकड्यातून 100 टन उसाचे उत्पादन घ्यावे व हे स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये उसाची को 86032 या जातीची लागवड केली. लागवड केल्यानंतर तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी सगळे नियोजन केले.

या सगळ्या नियोजनामध्ये त्यांनी दिवसभर बारीक सारीक कामांकडे व्यवस्थित लक्ष पुरवले व सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्येच काम करत राहिले. जसे जसे त्यांच्या शेतामध्ये उसाचे पीक बहरू लागले तसा तसा त्यांचा उत्साह वाढीस लागला. अगदी याच पद्धतीने घरातील मंडळीना त्यांना काम करत असलेले पाहून चिंता वाटायची व त्यामुळे बऱ्याचदा बाहेरगावी राहायला असलेली त्यांची मुले सुट्टीसाठी त्यांना बोलवत असत. परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या या म्हाताऱ्या अंगामध्ये तारुण्य संचारलेले होते व त्या पद्धतीने ते काम करत होते.

 बन्ने गुरुजींनी अशा पद्धतीने केले नियोजन

उसाचे उत्पादन मिळवण्याकरिता त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने नियोजन केले. यामध्ये 200 किलो नत्र तसेच शंभर किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश याप्रमाणे वापर करण्याचे नियोजन केले. उसाच्या या चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी आठ गोणी युरिया त्यासोबत 12 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट तसेच चार गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश  टप्प्याटप्प्याने वापरले. इथपर्यंतचा खर्च त्यांना 14500 आला होता. शेवटी जी काही खतांची कमतरता भासली ती जिवाणू खतांच्या जोरावर त्यांनी भरून काढली.

त्यांनी पिकाला दिलेल्या सर्व अन्नद्रव्यांचे व्यवस्थित विघटन झाले व त्याचा सकारात्मक परिणाम हा उसाच्या पिकाकडे पाहिल्यावर दिसून येत होता. यामध्ये त्यांनी नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा वापर केला व यामुळे सुरुवातीपासून उसाची तोड येईपर्यंत कांड्यांची लांबी सहा इंचापर्यंत त्यांना मिळाली.

सिंगल सुपर फॉस्फेट चे विघटन स्फुरद उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे उसाच्या पानांची लांबीमध्ये लक्षणेरीत्या वाढ झाली व याचा सकारात्मक परिणाम हा उसाच्या जाडी वाढण्यावर झाला. त्यासोबतच उसाच्या पानांवर पालाश या अन्नद्रव्याची कमतरता दिसू नये याकरिता पानांचे वारंवार निरीक्षण गुरुजी करत होते. बऱ्याच वेळा म्युरेट ऑफ पोटॅश याचा वापर त्यांनी केला परंतु उसाच्या पानांवरील कमतरता भरून निघाली नाही

त्यामुळे त्यांनी जमिनीमधून पाण्यावाटे पालाश उपलब्ध करणारे जिवाणूंचा वापर केला व काही दिवसांमध्ये याही अन्नद्रव्याची गरज पूर्ण झाली. अशा पद्धतीने नियोजन करत असताना त्यांनी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सातत्य ठेवले. यामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या देखील उद्भवल्या जसे की त्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन देखील झाले. पाण्याची कमतरता जाणवली व मजुरांची समस्या देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर जाणवली.

उसाच्या फडात उंदरांनी देखील थैमान घालायला सुरुवात केली. या व अशा अनेक अडचणींचा सामना करत त्यांचा ऊस कारखान्यामध्ये शेवटी गेला. जेव्हा उसाच्या वजनाची पावती हातात आली व सगळ्या ज्या काही उसाच्या खेपा कारखान्यात गेल्या होत्या त्यांची पूर्ण बेरीज केली तेव्हा कळले की 50 गुंठ्यामध्ये चक्क 105 टन उसाचे उत्पादन त्यांना मिळाले.

म्हणजेच एकेकाळी आयुष्यात एकदा तरी 50 गुंठ्यामध्ये 100 टन उसाचे उत्पादन घेण्याचे गुरुजींचे स्वप्न त्यांनी अफाट कष्ट करून आणि तेही वयाच्या सत्तरीत पूर्ण करून दाखवले. या उत्पादनातून त्यांनी 50 गुंठ्यामध्ये तीन ते चार लाख रुपयापर्यंत आर्थिक उत्पन्न देखील मिळवले. यामध्ये जिवाणू खते आणि चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट ची मदत त्यामुळे हे शक्य झाले.

यावरून आपल्याला दिसून येते की कुठलेही काम करताना तुमचे वय कधीच आडवे येत नाही. फक्त तुमची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी राहिली तर तुम्ही ठरवलेले ध्येय आरामात पूर्ण करू शकतात हे बन्ने गुरुजींच्या उदाहरणावरून दिसून येते.