Government Scheme For Women:- महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात येत असून या उपाययोजनांच्या माध्यमातून महिला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या भक्कम व मजबूत व्हाव्यात व त्यांचे जीवनमान उंचवावे हा त्यामागचा उद्देश आहे.
तसेच काही योजनांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज स्वरूपात मदत करण्यात येते व त्यातून महिला आर्थिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण होतात व त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
महिलांना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल व त्याकरिता पैसा लागत असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून असलेल्या काही योजनांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या लेखात आपण अशा दोन योजना बघणार आहोत की ज्या महिलांना व्यवसाय उभारणीसाठी कर्ज पुरवठा करतात.
महिलांसाठी खूपच फायद्याच्या आहेत या दोन योजना
1- उद्योगिनी कर्ज योजना- केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून उद्योगिनी योजना महिलांसाठी राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याकरिता त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाते.
तसे पाहायला गेले तर ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केलेली होती व आता केंद्र सरकार संपूर्ण देशात राबवत आहे. केंद्र सरकारचे महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाची ही योजना असून या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना स्वस्त कर्ज आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते.
उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारी आणि खाजगी बँकांकडून कर्ज मिळवता येते तसेच गरज असल्यास व्यवसायाचे प्रशिक्षण देखील मिळते.
उद्योगिनी योजनेसाठी कर्ज पात्रता
1- या योजनेअंतर्गत ज्या महिलांना कर्ज घ्यायचे आहे त्यांनी आपले उद्योग नोंदणीकृत केले आहे अशाच महिलांना कर्ज मिळते.
2- या योजनेअंतर्गत फक्त महिला अर्जदारांचा कर्जासाठी विचार केला जाईल. फक्त महिलाच या योजनेसाठी पात्र ठरतात.
3- ही योजना 18 ते 55 वयोगटातील महिलांसाठी उपलब्ध आहे.
4- यामध्ये अर्ज करणाऱ्या महिला अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न एक लाख 50 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे.
5- विशेष म्हणजे यामध्ये अर्ज करणारी महिला जर विधवा आणि अपंग असेल तर अशा महिलांना वार्षिक उत्पन्नाची अट नाही.
6- तसेच या योजनेच्या माध्यमातून विधवा, अपंग महिला आणि एससी / एसटी कॅटेगरीतील महिलांचा समावेश असून त्यांना व्याज मुक्त कर्ज देखील मिळू शकते.
2- लखपती दीदी कर्ज योजना- ही केंद्र सरकारची योजना खूप महत्त्वाची असून एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात लखपती दीदी योजनेचे टार्गेट दोन कोटींवरुन आता तीन कोटी पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.
लखपती दीदी योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना या माध्यमातून एक लाखापासून ते पाच लाख रुपयांपर्यंत व्याज मुक्त कर्ज मिळते. ही योजना 15 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. अगोदर या योजनेत दोन कोटी महिला इतके उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते.
परंतु या योजनेची लोकप्रियता पाहून अंतरीम अर्थसंकल्पांमध्ये त्याचे टार्गेट आता तीन कोटीपर्यंत वाढवण्यात आले आहे. या योजनेत कौशल्य प्रशिक्षण घेण्यासोबतच महिलांना सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळते. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते व हे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त असते.
लखपती दीदी कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता
ही योजना प्रामुख्याने 18 ते 50 वयोगटातील सर्व भारतीय महिलांसाठी राबवली जाते. लखपती दीदी योजनेमध्ये पात्र होण्याकरिता मात्र महिलांनी एखाद्या स्वयंसहायता बचत गटाचा भाग असणे खूप गरजेचे आहे. इतकेच नाही तर त्यांनी बचत गटांमध्ये सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे.