कशाला लागता नोकरीच्या मागे! सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळवा 20 ते 50 लाख अर्थसहाय्य आणि व्हा उद्योजक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या दरवर्षी शाळा कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व त्या तुलनेत निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी या अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. बेरोजगारीची समस्या ही अत्यंत ज्वलंत अशी समस्या असून भारतापुढील हे एक प्रमुख आव्हान आहे.

त्यामुळे बेरोजगार निर्मूलनाकरता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचे प्रयत्न हे करण्यात येतात. त्यामुळे सुशिक्षित अशा तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या अनेक योजना या फायद्याच्या ठरताना दिसून येत आहेत.

यामध्ये तरुण-तरुणींना व्यवसाय उभारता यावा म्हणून अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत किंवा अर्थसहाय्य करण्यात येते. अशा योजनांमध्ये एक महत्त्वपूर्ण योजना आपण बघणार आहोत जी तरुणांना उद्योजक होण्यासाठी आर्थिक मदत करते.

 या योजनेतून मिळते 20 ते 50 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य

तरुण-तरुणींना उद्योजक होण्याची संधी मिळावी याकरिता राज्य शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना उद्योजक होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

यामध्ये खादी आयोगाने ठरवलेल्या नकारात्मक उद्योगांव्यतिरिक्त सर्व उद्योगांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून उत्पादन उद्योगाकरिता 50 लाख आणि सेवा उद्योगाकरिता वीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत तर शहरी व ग्रामीण भागामध्ये जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे करावा अर्ज?

1- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे.

2- त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राकडे देखील यासाठी संपर्क करता येतो.

3- त्यासोबतच maha.cmegp@gmail.com या मेल आयडीवर देखील तुम्हाला संपर्क करता येऊ शकतो.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली पात्रता

1- त्यामध्ये अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्ष असावे. यामध्ये वैयक्तिक व्यक्ती लाभार्थी राहते तसेच  वैयक्तिक मालकी, भागीदारी तसेच वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट या योजनेकरता पात्र आहेत.

2- यामध्ये दहा लाखांवरील प्रकल्पाकरिता सातवी पास व 25 लाखांवरील प्रकल्पाकरिता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबामध्ये एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ हा दिला जातो. तसेच अर्जदाराने केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधार कार्ड तसेच जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळेचा निर्गम उतारा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती करिता जात प्रमाणपत्र, माजी सैनिक तसेच दिव्यांग यांच्याकरिता सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र,

कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले असेल तर त्याचे प्रमाणपत्र, ग्रामीण भागाकरिता ग्रामसेवकांचा लोकसंख्या दाखला, योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले हमीपत्र जे भरणे आवश्यक आहे व त्यासोबतच प्रकल्प अहवाल अशा प्रकारचे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आहे महत्त्वाचे

योजनेचा लाभ घेण्याअगोदर लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना दोन आठवड्यांचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. ही प्रशिक्षणाची सुविधा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र किंवा राज्यस्तरीय सनियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या इतर नामवंत संस्थांमध्ये दिले जाते.