Gold Rate: सध्या लग्नसराईचा कालावधी सुरू आहे आणि याच कालावधीमध्ये मात्र सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी अशी वाढ झाल्याचे आपण बघत आहोत. सध्या सोन्याचे दर हे 70 हजार रुपयांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे व हीच दरवाढीची स्थिती चांदीची देखील आहे.
जे लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात त्या लोकांसाठी मात्र सोन्या आणि चांदीचे असे वाढलेले बाजार भाव हे दिलासा देणारे आहेत. परंतु ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे व त्यांना सोने खरेदी करायचे असेल या व्यक्तींकरिता मात्र सोने आणि चांदीच्या दरातील वाढ ही समस्या होऊन बसली आहे.
त्यामुळे सोन्याचे दर कधी नव्हे एवढे वाढण्यामागील कारणे काय असतील? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला नसेल तर नवलच. तसेच सोन्याचे दर हे कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतात किंवा कसे ठरवले जातात? हा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असेल. चला तर मग आपण या लेखांमध्ये या संबंधीची थोडक्यात माहिती बघू.
सोन्याचे दर कसे ठरतात?
जर आपण सोन्याच्या बाजारभावाचा विचार केला तर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर ते ठरत असतात व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव हा प्रति औंस अमेरिकन डॉलरमध्ये ठरतो. इतर वस्तूंप्रमाणेच जगात सोन्याचे एकूण उत्पादन किती आहे
व त्याची मागणी यावर हा दर ठरत असतो. आपल्याला वाटते की सणांचा कालावधी किंवा लग्नसराई यामुळे दर वाढत असतील. परंतु या बाबींचा सोन्याच्या दरवाढीशी जास्त प्रमाणामध्ये कुठलाही संबंध येत नाही.
भारतामध्ये सध्या सोन्याचे भाव वाढले परंतु का?
सध्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात सोन्याच्या दराने उच्चांकी उसळी घेतलेली आहे. त्यामागचे प्रमुख कारण पाहीले तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. हे अगदी साध्या सोप्या शब्दात जर समजून घ्यायचे असेल तर अमेरिकन डॉलर हा भारतीय रुपयापेक्षा महाग झालेला आहे.
परंतु सोन्याचे दर हे अमेरिकन डॉलरमध्ये ठरत असल्यामुळे सध्या भारतामध्ये सोन्याच्या भावाची ही स्थिती आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिऔंस डॉलरमध्ये बरीच वाढ झालेली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये कमी झाल्यामुळे प्रति औंस सोन्याचे दर भारतामध्ये वाढल्याची स्थिती आहे.
डॉलर आणि रुपयाचे मूल्य यामध्ये महत्त्वाचे
भारतामध्ये सोन्याचा भाव हा डॉलर आणि रुपया यांचा विनिमयाचा जो दर आहे त्यावर अवलंबून असतो. आपण दहा वर्षांपूर्वी म्हणजेच एक एप्रिल 2014 रोजी सोन्याचा भाव पाहिला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेराशे डॉलर प्रति औंस इतका होता व भारतामध्ये या हिशोबाने 29 हजार रुपये प्रतितोळा दर होते.
पण तो आता दहा वर्षांनी म्हणजेच एक एप्रिल 2024 रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दर 2260 डॉलर प्रति औंस इतका झाला व त्यामुळे भारतात रुपयात जर आपण सोन्याचे दर पाहिले तर ते 69 हजार रुपये प्रति तोळा इतके झाले.
म्हणजेच एकूण दहा वर्षात डॉलरच्या तुलनेत विचार केला तर सोन्याच्या दरात तब्बल ७४ टक्क्यांनी वाढ झाली व भारतीय बाजारामध्ये सोन्याचे दर तब्बल 140 टक्क्यांनी वाढले. म्हणजेच अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे असेल तर 2014 मध्ये एक अमेरिकन डॉलर करता भारतीय चलनात 61 रुपये मोजावे लागायचे.
अमेरिकन एक डॉलर बरोबर भारताचे 61 रुपये असे प्रमाण होते. परंतु आता 2024 मध्ये एका डॉलरला 83 रुपये मोजावे लागत आहेत. याच कारणामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची स्थिती आहे.