प्रत्येकाला आपले स्वतःचे हक्काचे घर असावे ही इच्छा असते. त्यामुळे आजकालची तरुणाई ही जेव्हा एखाद्या नोकरीमध्ये किंवा बिजनेसमध्ये सेट होण्याचा प्रयत्न करते तेव्हा स्वतःचे हक्काचे घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असतात व त्याकरिता पैशांची जुळवा जुळव देखील करतात.
तसेच सध्या घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच घर विकत घेता येईल हे शक्य नसते. त्यामुळे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच जण बँकांद्वारे देण्यात येणाऱ्या होमलोनचा आधार घेतात. तसेच आता बँकांच्या माध्यमातून देखील होमलोनची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ करण्यात आल्यामुळे पटकन होम लोन उपलब्ध होते व घराचे स्वप्न पूर्ण होते.
परंतु तुम्हाला जर होमलोनच्या माध्यमातून काही आर्थिक स्वरूपाचे फायदे हवे असतील तर तुम्ही पत्नी किंवा अन्य कोणासोबत जोडीने म्हणजे जॉईंट होम लोन घेतले तर आयकर सवलतीचा दुहेरी फायदा मिळण्याची शक्यता वाढते. यामध्ये जर तुम्ही पत्नीसोबत घर घेतले तर जवळपास सात लाखांचा टॅक्स तुम्ही वाचवू शकता. याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
जॉईंट होम लोन घेतल्यामुळे व्याजात मिळते सूट
तुम्ही जर घर घेण्यासाठी बँकेकडून जॉईंट होमलोन घेतले तर तुम्हाला यामध्ये आयकर कायदा कलम 80(सी) आणि कलम 24(बी) नुसार सवलतींचा फायदा मिळण्याची शक्यता असते. यामध्ये आयकर कायदा कलम 80(सी) नुसार दोन्ही कर्जदारांना प्रत्येकी दीड लाखांचे टॅक्स बेनिफिट मिळते.
तसेच दुसरा फायदा जर पाहिला तर आयकर कायदा कलम 24(बी) नुसार दोन्ही कर्जदारांना व्याजामध्ये दोन लाखापर्यंत सूट मिळण्यासाठी दावा देखील दाखल करता येतो. म्हणजेच अशाप्रकारे दोन्ही कर्जदारांना जॉईंट होमलोनवर प्रत्येकी कमाल साडेतीन लाख रुपयांची सवलत मिळू शकते.
जॉईंट होम लोनचे फायदे घेण्यासाठी असलेल्या आवश्यक अटी
1- जॉईंट होमलोनमध्ये जर दोघांना सात लाखांचा टॅक्स बेनिफिट घ्यायचा असेल तर दोघेही सदर प्रॉपर्टीचे सहमालक असणे गरजेचे आहे.
2- तसेच घर किंवा प्रॉपर्टीची नोंदणी करताना दुसऱ्या सदस्यांची नोंद ही को-बॉरोअर म्हणजेच सहकर्जदार म्हणून असणे गरजेचे आहे.
3- तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहकर्जदाराचा थेटपणे सहभाग असणे गरजेचे आहे. म्हणजेच घेतलेल्या कर्जाचा ईएमआय संबंधित सह कर्जदाराने देखील भरला पाहिजे.
4- समजा प्रॉपर्टीवर तुमचे नाव आहे परंतु कर्ज घेताना सह कर्जदार म्हणून नोंद नसेल तर टॅक्स बेनिफिट मिळत नाही.
जॉईंट होमलोन घेतल्याने मिळतात इतर फायदे
1- समजा अशा प्रकरणांमध्ये जर एकाचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर कर्ज घेण्यामध्ये अडचण येत असल्यास दुसऱ्याचा चांगला क्रेडिट स्कोर तुम्हाला कर्ज मिळवण्यामध्ये फायद्याचा ठरतो.
2- तसेच दोघांमध्ये एकाचे मासिक उत्पन्न जर कमी असेल तर हवे तितके कर्ज तुम्हाला मिळू शकत नाही. परंतु दोघेही जर पैसे कमावणारे असतील तर मात्र ही अडचण दूर होण्यास मदत होते व तुम्हाला हवे तितके कर्ज मिळते.