जेव्हा जीवनामध्ये एखाद्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. अशावेळी व्यक्ती बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी प्रयत्न करतो किंवा मित्र, नातेवाईक यांच्याकडून हातउसने किंवा व्याजाने पैसे घेतो. साहजिकच यामध्ये जर बँकेकडून कर्ज घेतले तर आपल्याला महिन्याला त्याचे ईएमआय भरावे लागतात व काहीसा या कर्जाचा व्याजदर देखील जास्त असतो.
त्यामुळे नक्कीच आपल्याला आर्थिक भार सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला अशा पद्धतीची आपत्कालीन पैशांची गरज उद्भवली तर तुम्ही तुमच्याकडे जर एलआयसी पॉलिसी असेल तर त्यावर कर्ज घेऊ शकता. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसी वर घेतलेले कर्ज हे पर्सनल लोनपेक्षा स्वस्तात मिळते
आणि त्याची परतफेड करणे देखील अगदी सोपे असते. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला या कर्जाचा ईएमआय भरण्याची देखील गरज नसते. त्यामुळे आपण एलआयसीच्या माध्यमातून कशा पद्धतीने कर्ज घेता येते? त्याचे नियम काय असतात? याबद्दल माहिती घेऊ.
एलआयसी पॉलिसीवरील कर्जाचे वैशिष्ट्ये
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही जर एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेतले तर हे कर्ज सुरक्षित कर्जाचे श्रेणीमध्ये येते. कारण यामध्ये तुम्ही घेत असलेल्या कर्जाची हमी ही तुमची जीवन विमा पॉलिसी असते. त्यामुळे तुम्हाला जास्त कागदपत्रे द्यावे लागत नाहीत आणि कर्ज देखील लवकरात लवकर मिळते.
2- तसेच या कर्जाचा एक फायदा म्हणजे तुम्हाला तुमची एलआयसी पॉलिसी सरेंडर करण्याची देखील गरज भासत नाही. म्हणजेच तुम्ही विमा पॉलिसीवर कर्ज जरी घेतले तरी विम्यातून तुम्हाला जे काही मिळणारे फायदे असतात ते मिळतातच.
3- तसेच एलआयसी पॉलिसी वरील कर्ज हे पर्सनल लोनपेक्षा स्वस्तात मिळते. तसेच विशेष म्हणजे त्याला कुठलाही प्रकारचे प्रक्रिया शुल्क किंवा छुपे शुल्क आकारले जात नाही.
किती मिळतो परतफेडीचा कालावधी?
तुम्ही तर एलआयसी पॉलिसी वर कर्ज घेतले तर त्याचा परतफेड करण्याचा कालावधी देखील सोपा असतो. यामध्ये भरपूर वेळ कर्जदाराला दिला जातो. कर्ज परतफेडीचा कालावधी हा किमान सहा महिन्यांपासून तर विमा पॉलिसीच्या मुदत पूर्ण होईपर्यंत देखील असू शकतो.
तसेच सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये घेतलेल्या कर्जावर दरमहा ईएमआय भरण्याचे देखील टेन्शन राहत नाही. जसे तुमच्याकडे पैसे येत राहतात तसे तसे तुम्ही पैसे भरू शकतात. फक्त यामध्ये लक्षात एकच गोष्ट ठेवली पाहिजे की यामध्ये मात्र वार्षिक व्याजाचा भर पडत असतो.
यामध्ये तुम्हाला तीन पर्यायांमध्ये कर्जाची परतफेड करता येते. यातील पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण मुद्दल रक्कम व्याजासह परत करणे, दुसरा म्हणजे विमा पॉलिसीच्या मुदत पूर्ण होण्याच्या वेळी दाव्याच्या रकमेसमोर रक्कम सेटल करणे. यामध्ये तुम्हाला फक्त व्याजाची रक्कम भरावी लागते आणि तिसरा पर्याय म्हणजे व्याजाची रक्कम दरवर्षी भरा आणि मूळ रक्कम स्वतंत्रपणे परत करणे.
काय आहेत एलआयसी पॉलिसी वरील कर्जाचे नियम?
1- या प्रकारचे कर्ज फक्त पारंपारिक आणि एडॉवमेंट पॉलिसी सारख्या काही निवडक पॉलिसीवर उपलब्ध आहे.
2- सरेंडर मूल्य किती आहे यानुसार तुमची कर्जाची रक्कम ठरत असते. तुमच्या पॉलिसीच्या सरेंडर मूल्याचे 80 ते 90% पर्यंत कर्ज मिळते.
3- व्याजदर हा पॉलिसीधारकाची प्रोफाइल कशी आहे त्यावर अवलंबून असतो. सहसा दहा ते बारा टक्क्यांचा व्याजदर असतो.
4- या प्रकारच्या कर्जामध्ये विमा कंपनी तुमची पॉलिसी गहाण ठेवते. त्यामुळे कर्जाची परतफेड केली नाही किंवा थकीत कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर मूल्यापेक्षा जास्त असल्यास तुमची पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार विमा कंपनीला आहे. जर तुमची विमा पॉलिसी कर्जाची परतफेड करण्यापूर्वी परिपक्व झाली असेल तर विमा कंपनी तुमच्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करू शकते.
कुठे अर्ज कराल?
एलआयसी पॉलिसीवर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन करिता तुम्हाला एलआयसी कार्यालयामध्ये जाऊन केवायसी कागदपत्रांसह कर्जासाठी अर्ज करावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता एलआयसी ई सेवांसाठी नोंदणी करून तुमच्या खात्यात लॉगिन करून या कर्जासाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतो.