अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत येत्या दोन-तीन दिवसांत महत्वाच्या बैठका होत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेत असताना आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज तातडीने दिल्ली रवाना होत असल्याचे समजते.

त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उद्यापासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचे राज्यातील महत्वाच्या घडामोडीबाबत दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबत काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. तीनच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अमित शहांची भेट घेतली होती.

त्यापूर्वी त्यांनी नितीन गडकरी यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार-अमित शहांची बैठक झाल्याने राज्यात भाजपांतर्गत फेरबदल करण्याबाबत मोठे निर्णय घेतले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यातच देवेंद्र फडणवीस हे आता अमित शहांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असून, चंद्रकांत पाटील देखील दिल्लीत दाखल होत असल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता व्यक्त होत आहे.