अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचेही त्यांनी वारंवार बोलून दाखवले होते. त्यामुळे आता पाटलांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव आपल्या हातावर कोरलं आहे.

त्यामुळे, त्यांचे फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नरेंद्र पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीही पुढाकार घेऊन सभा आणि बैठकांना उपस्थिती लावत आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत आहे,

असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले. जे पोटात तेच ओठात असणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील एकमेव नेते आहेत.

त्यांची कार्यपद्धती अन् कर्तुत्वाचे आपण फॅन झालोय, असे नरेंद्र पाटील यांनी हा टॅटू गोंदल्यानंतर म्हटलं. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम पुन्हा जगजाहीर झालं आहे.