अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अहमदनगर शहरातील खड्ड्यातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यास आजच्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

७ हजार ४१० स्के.मीटर रस्त्याचे पॅचिंग करून ते बुजविले जाणार आहेत. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ऑनलाईन पध्दतीने झाली.

या सभेत रस्ते पॅचिंंग आणि ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदीचा महत्वाचा विषय सभेसमोर होता. या दोन्ही विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. कोविड काळात अर्थसंकल्पनुसार खर्चाला कात्री लावण्यात आली होती.

त्यामुळे रस्ते पॅचिंगचे काम रखडले होते. पॅचिंगसाठी पावणेदोन कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली होती. मात्र, रुपयाही खर्च झाला नव्हता. आजच्या सभेत नगर शहरातील खड्डे बुजविण्यासाठी १ कोटी रुपये खर्च करण्याला सभेने मंजुरी दिली.

दोन ठेकेदार नियुक्त करून हे खड्डे बुजविले जाणार आहेत. सभेच्या मंजुरीसाठी आता टेंडर मागवून ते काम सुरू केले जाणार असल्याची माहिती सभापती अविनाश घुले यांनी दिली.

कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती सभेसमोर ठेवला होता.

७ लिटरचे १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदीसाठी मागविलेल्या निविदेत ९ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील मध्यप्रदेशातील इंदोरच्या साक्षी सेल्स अ‍ॅन्ड सोल्युशन कंपनीची सर्वात कमी निविदा सभेत मंजूर करण्यात आली.

३ हजार ९०० रुपयांना एक या प्रमाणे शंभर ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदीसाठी ३९ लाख ८९ हजार रुपये खर्चास सभेने मान्यता दिली.

विकत घेणारे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हे महापालिकेच्या आठ आरोग्य केंद्रात ठेवले जाणार आहे. गरजूंना ते कसे द्यायचे याचे धोरणानंतर ठरविले जाणार आहेत.