अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  रात्रीचे वेळी शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. श्रीहरी हरीदास चव्हाण (वय 19 रा. वाळकी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्या सोबतचे अन्य दोन साथीदार पसार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, 23 जूनच्या रात्री आरोपींनी वैजयंता सोपान भापकर (वय 65) यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांना चाकूचा धाक दाखवित सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, मोबाईल असा 23 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.

भापकर यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना सदरचा गुन्हा श्रीहरी चव्हाण व त्याचे साथीदार सादीस जाकीट काळे, साहेबराव आनंदा गायकवाड (दोघे रा. वाळूंज ता. नगर) यांनी केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेत आरोपी चव्हाण याला जेरबंद करण्यात यश आले. तर त्याचे सहकारी पसार झाले आहेत. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.