file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अलीकडे भरदिवसा चोरटे चोरी करत आहेत. त्यात भुरट्या चोरांचा तर सुळसुळाट झाला आहे. मात्र अनेकदा चोरी करणे या चोरांच्या जीवावर देखील बेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशीच एक घटना श्रीरामपूर येथे घडली आहे. यात चोरीच्या उद्देशाने रेल्वेच्या बोगीमध्ये गेलेल्या मोबाईल चोराचा दुसऱ्या रेल्वेखाली सापडून दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुजाहिद मस्तान शेख असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत श्रीरामपूर पोलिसांनी सांगितले, मृत मुजाहिद मस्तान शेख हा त्याचे साथिदार जुबेर हारूण शेख, इरफान मैनुद्दिन सय्यद ऊर्फ काझी ऊर्फ इप्या, अरबाज जब्बार शहा यांच्यासह चोरी करण्यासाठी श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर गेले होते.

रात्री २ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र एक्स्प्रेस आली असता, मुजाहिद हा चोरी करण्याच्या उद्देशाने रेल्वेच्या बोगीत घुसला. मात्र यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने त्याने बोगीतून उडी मारली;

मात्र नेमके याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून रेल्वे आल्याने या रेल्वेखाली सापडला व ठार झाला. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याला साखर कामगार रुग्णालयात नेले; परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.