अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  नगर औरंगाबाद महामार्गावरील जेऊर शिवारात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांत दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीटाचा मृत्यू झाला तर विहीरीत पडुन हरणाचा मृत्यू झाला आहे.

जेऊर परिसरातील लिगाडे वस्ती येथे ही घटना घडली. अपघातात काळविटाचा पाय फॅक्चर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी काळविटावर घटनास्थळी उपचार केले. जखमी काळविटाला वाचविण्यासाठी परिसरातील तरुणांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मदतीने नगर येथील वनविभागाच्या कार्यालयात नेऊन तेथे त्याच्या पायावर उपचार करण्यात आले.

परंतु गंभीर रित्या जखमी झालेल्या काळविटाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत इमामपूर येथील बहिरोबा मळ्यातील बहिरु आवारे यांच्या शेतातील विहिरीत पडुन हरणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारीच घडली.

विहीरीतील पाण्यात बुडुन हरणाचा मृत्यू झाला आहे. जेऊर परिसरात एकाच दिवशी दोन हरणांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमी कडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.