अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- आधीच कोरोनामुळे आमच्यावर अत्यंत वाईट वेळ आली आहे. त्यात आम्ही रस्त्यावर बसून व्यवसाय करतो म्हणून पालिकेने आम्हाला हटवुन अन्याय केला आहे.

तरी आमचे व्यवसाय आहे त्याच जागेवर सुरु करण्यास परवानगी द्या, अन्यथा आम्ही पालिका कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करू असा इशारा हातगाडी व्यावसायिकांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून दिला.

पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी हातगाडे लावून अनेकजण विविध व्यवसाय करत होते. मात्र तीन दिवसांपूर्वी पालिकेने या सर्वांना रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून व्यवसाय करण्यास मनाई केल्याने या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यातील अनेकजण कित्येक वर्षा हेच व्यवसाय करत आहेत. त्यांचा कोणालाही त्रास नसतानाही पालिकेने त्यांना या जागेवर बसून व्यवसाय करण्यास परवानगी नाकारल्याने जगायचे कसे असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे.

पालिकेने योग्य ती जागा सुद्धा व्यवसाय करण्यास पर्याय म्हणून उपलब्ध करून दिली नाही. उपासमारीची वेळ या विक्रेत्यांवर आली आहे.

तरी आहे त्या ठिकाणी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा दि.२७ जुलै पासून पालिका कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला.