अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर काम करणाऱ्या मुलाने आपल्या डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी आपलेच अपहरण झाले असे भासवून वडिलांना बुचकळ्यात पाडले, कोतवाली पोलिसांनी अवघ्या आठ तासांत हा प्रकार उघडकीस आणला आहे.

दरम्यान स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. नेवासा तालुक्यातील देवगड येथून त्याला ताब्यात घेेेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश एकनाथ मुळे (रा. शिराळ चिचोंडी ता. पाथर्डी) असे या युवकाचे नाव आहे.

दरम्यान या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी त्या मुलाला ऑनलाइन जुगारीचा नाद असल्याचे समजले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आकाश हा नगरमधील एका हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतो. त्याला पैशाची गरज असल्याने त्याने अपहरणाचा बनाव रचला.

मंगळवारी रात्री ड्यूटी संपल्यावर घरी न जाता वडिलांना फोन करून माझे पैशासाठी अपहरण झाले असल्याचे सांगितले. मला दोन लाख द्या, तरच ते लोक सोडतील असे तो वडिलांना फोन करून सांगत होता. त्याच्या वडिलांनी तात्काळ कोतवाली पोलिसांशी संपर्क साधला.

कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पोलीस पथकाने तातडीने युवकाचा शोध घेतला, त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने बनाव केल्याची कबूली दिली.