जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतीची प्रभाग रचना आरक्षण तसेच सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता शिर्डी नगरपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला असून आता खऱ्या अर्थाने आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी होणारी राजकीय रणधुमाळी रंगली जाणार आहे.

दरम्यान यावर्षी डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या १७ व मुदत समाप्त झालेल्या २ आणि नवनिर्मित ७ अशा राज्यातील एकूण २६ नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार प्रभाग रचनेचे तीन मुख्य टप्पे राहणार आहेत.

यामध्ये आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना करणे, हरकती व सूचनांवरील सुनावणी घेणे, व अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे प्रभाग रचना करताना गुगल मॅप वापरून त्यावर प्रगणक गट दर्शवण्यात यावेत तसेच मुख्याधिकारी यांनी अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणासह प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव तयार करावा.

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार या कार्यक्रमाचा टप्पा पुढील प्रमाणे गुरुवार दि. ११ नोव्हेंबरपर्यंत सदरच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी मान्यता देतील. त्यानंतर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडत काढणे, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील महिला नागरीकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल.

शुक्रवार दि १२ नोव्हेंबर ते मंगळवार दि.१६ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी आहे. त्यानंतर बुधवार दि. १७ नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यावर सुनावणी होईल.