लोकसभेसाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान, विखे-पाटील यांच्या साम्राज्याला सुरंग लागणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics 2024 : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आता मंच तयार करायला सुरुवात केली आहे. राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने नवनवीन घटना घडतं आहेत. खरे तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे आपल्या महाराष्ट्रात राजकीय समीकरणे जलद गतीने बदलू पाहत आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आता लोकसभेसाठी आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये आता इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

विविध पक्षांमधून लोकसभा लढवू इच्छिणाऱ्यांनी दिग्गज मंडळीने आता आपली मनातील इच्छा ओठांवर आणली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात विशेष रंगतदार होणार आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठ्या जिल्ह्यात येत्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी लोकसभा आणि नगर दक्षिण लोकसभा अशा या दोन जागा आहेत. यापैकी नगर दक्षिण लोकसभा जागेकडे सर्वच पक्षांचे विशेष लक्ष पाहायला मिळत आहे. विखे विरोधक मंडळी आता सक्रिय झाली आहे. वास्तविक नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाला विशेष महत्त्व आहे.

या मतदारसंघातला विखे-गडाख या खटल्याने देशाला आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करायला लावली होती. या मतदारसंघाने शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे पाटील यांचा कडवा राजकीय संघर्ष दाखवून दिला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या तत्कालीन काँग्रेसमधील राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधारी बीजेपीच्या उमेदवारासाठी म्हणजेच त्यांच्या सुपुत्रासाठी अर्थातच डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रचार केल्याची घटना देखील नगर लोकसभा मतदारसंघात घडली आहे. या घटनेमुळे 2019 लोकसभा निवडणूक विशेष रंगतदार बनली होती. आता पुन्हा एकदा नगर लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक खूपच रंगतदार बनणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या मुठीत

नगर लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. 1952 ते 1998 अशी तब्बल 46 वर्ष म्हणजेच साडेचार दशकांपेक्षा अधिकचा काळ हा मतदारसंघ काँग्रेसच्या मुठीत होता. आता मात्र या मतदारसंघाची धुरा भाजपाकडे आहे. 1998 मध्ये सध्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे जे की तेव्हा शिवसेनेत होते ते या जागेवरून निवडून आलेत. बाळासाहेब विखे यांच्यानंतर मात्र येथे भाजपाच्या दिलीप गांधी यांनी वर्चस्व कायम ठेवले. सलग तीन पंचवार्षिक दिलीप गांधी यांनी येथून विजय मिळवला होता. परंतु गेल्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

खरे तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपा मध्ये का प्रवेश केला हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य वाटत असल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपाने त्यांना या जागेसाठी उमेदवारी दिली. यानंतर त्यांचे वडील वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश घेतला. आता पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी सुजय विखे पाटील यांनी साखर वाटप आणि चणाडाळ वाटपाच्या माध्यमातून मत पेरणी सुरू केली आहे. यातून त्यांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे सोबतच स्व-पक्षावर उमेदवारीसाठी दबाव तयार करत आहेत.

डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापुढील स्व-पक्षीय आव्हान

या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जेवढा रंजक आहे, तेवढाच वर्तमानही रंजक होत आहे. विशेष म्हणजे या जागेचे भविष्य देखील तेवढेच रंजक राहणार हे जवळपास नक्की झाले आहे. कारण की, सध्या स्थितीला डॉक्टर सुजय विखे यांना या जागेवरून तिकीट मिळणार असे जरी भासत असले तरी देखील महायुतीमधून त्यांना विरोधकांपेक्षा अधिकचे आव्हान मिळू लागले आहे. महायुतीमधील घटक पक्ष तर सोडाच डॉक्टर सुजय यांना स्व-पक्षातील नेत्यांनी देखील आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. बीजेपीचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विखे यांच्या विरोधात मोर्चा खोलला आहे. त्यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे आता माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

विखे यांच्या पुढील महाविकास आघाडीचे आव्हान

एकीकडे स्व-पक्षातून विखे यांच्या विरोधात भूमिका घेतली जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील आता विखे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उतरवण्यासाठी चाचपणी करत आहे. महाविकास आघाडीतून या जागेसाठी शरद पवार यांच्या गटाने दावा ठोकला आहे. आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्ता तनपुरे, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके यांची नावे शरद पवार यांच्या गटाकडून या जागेसाठी पुढे येऊ लागली आहेत. मात्र यातील कोणीही विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्यास स्वतःहून इच्छुकता दाखवलेली नाही.

तथापि पक्षाने आदेश दिल्यास यापैकी कोणीही या जागेसाठी उभे राहणार यात शंका नाही. एकीकडे शरद पवार यांचा गट या जागेसाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट शिवसेना देखील आता या जागेसाठी रस दाखवत आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नगरची जागा लढवण्यास शिवसेना इच्छुक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आमदार शंकरराव गडाख यांचे नाव या जागेसाठी पटलावर आणून ठेवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रसारमाध्यमांमध्येच त्यांच्या नावाविषयी सुतोवाच केला आहे.

आमदार लंके यांचे आव्हान 

स्व-पक्षातील नेते, महाविकास आघाडीतील नेते विखे यांच्या विरोधात आगामी लोकसभेसाठी जय्यत तयारी करत आहेत. दुसरीकडे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्ष, चिन्ह कोणते हे स्पष्ट न करता निलेश लंके यांनी डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र ते खरंच निवडणूक लढवणार का ? याबाबत संभ्रमावस्था आहे. खरेतर, राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकसंघ होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी निलेश लंके यांचे नाव पुढे केले जात होते.

परंतु, अजितदादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर निलेश लंके यांचे नाव आता या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागे पडत आहे. मात्र निलेश लंके यांच्या पत्नीने अर्थातच राणी लंके यांनी या मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढून या जागेवर लंके यांची दावेदारी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निलेश लंके अपक्ष निवडणूक लढवणार की शरद पवार गटाकडे माघारी जाणार की महायुतीत मोठी घडामोड होणार हे सारे काही अजून गुलदस्त्यातच आहे. भाजप विरोधी उमेदवार कोण राहणार हे अजूनही नक्की झालेले नाही. विशेष म्हणजे भाजपाकडून डॉक्टर सुजय विखे यांनाच या जागेवरून उमेदवारी मिळणार का हे देखील ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.