Ahmednagar News : विकास प्रक्रीयेत आड येणारी प्रवृत्ती तालुक्यातून बाजुला करण्याची हीच वेळ आहे. एकदा चुक केली आता पुन्हा करु नका, गणिमीकाव्याने परिवर्तन करुन, समृध्द पारनेर, सुरक्षित पारनेर निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा प्रयत्न करु. या तालुक्याचे उज्जल भविष्य घडवू असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
सुपा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाच्या खासदार डॉ.विखे पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, प्रा.विश्वनाथ कोरडे, काशिनाथ दाते, शिवसेनेचे बंडूशेठ रोहोकले, कल्याणशेठ शहाणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, सौ.आश्विनी थोरात आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात खासदार डॉ.विखे पाटील म्हणाले की, ज्यांची सुरुवातच विश्वासघातेने झाली आहे ते तालुक्याला कोणता विश्वास देणार असा प्रश्न उपस्थित करुन, आपल्याकडे फक्त प्रेमापोटी माणसं आहेत, भाडोत्री माणसांवर राजकारण करण्याची पध्दत आपल्याकडे नाही. तालुक्यात फक्त धमक्या देण्याचे काम सुरु आहे. घाबरुन जावू नका. या तालुक्यातील जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका कालही घेतली आणि उद्याही घेवू.
आज युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. ही सर्व युवा शक्ती एका विचाराने आपल्याबरोबर आली आहे. कारण आपल्याकडे कोणीही गुन्हेंगार नाही. या तालुक्याचा सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यायचा आहे. त्यामुळेच समृध्द पारनेर आणि सुरक्षित पारनेर हा मंत्र घेवून भविष्याच्या दृष्टीने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मंगलदास बांदल याप्रसंगी म्हणाले की, या तालुक्याला समृध्द अशी विचारांची परंपरा आहे. नगर जिल्ह्याला शरद पवार जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. ही निवडणूक केवळ सुजय विखे पाटलांची नाहीतर नरेंद्र मोदी विरुध्द शरद पवार अशी आहे. याचे गांभिर्य मतदारांनी ठेवले पाहीजे. विखे पाटील कुटूंबियांचे काम गेली अनेक वर्षे आपण पाहात आहोत. मोठी परंपरा त्यांची असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल शिंदे यावेळी म्हणाले की, विरोधी उमेदवारा बरोबर असलेले कार्यकर्तेच आज त्यांची पोलखोल करीत आहे. एकही कार्यकर्ता त्यांच्या बरोबर राहायला तयार नाही. आमदारकीचा राजीनामा देवून त्यांनी तालुक्याचा अनादर केला. त्यांनी उभे केलेले कोव्हीड सेंटर शासनाचे होते की प्रतिष्ठानचे हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. कोव्हीड सेंटरमध्ये मृत्यु झाल्याचे आकडे कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष विक्रम कळमकर यांनी मागील साडेचार वर्षात कार्यकर्त्यांच्या वाटेला फक्त अवहेलना आली, ही देशाची निवडणूक आहे. देशाची धोरण ठरविण्यासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सारखे नेतृत्व संसदेत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यास युवक कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.