Sangamner Politics : सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. संगमनेर बसस्थानकावर हा भव्य दिव्य उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे महायुतीच्या लोकप्रतिनिधींसह काही मंडळींनी दादागिरी करून हा जयंती उत्सव रद्द करण्यास सकल मराठा समाजाला भाग पाडल्याची माहिती कळते आहे.
शिवजयंती उत्सवावरून संगमनेर मध्ये राजकारण तापलेले आहे. महायुतीच्या वतीने यावर्षी संगमनेर मध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा उत्सव संध्याकाळी मिरवणुकीने साजरा होणार होता. दरम्यान सकाळच्या सत्रात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बसस्थानकाच्या दरम्यान शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार होता.

यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, मॅरेथॉन, मर्दानी खेळ, लाईट शो, आरोग्य शिबिर, संध्याकाळी आतिषबाजी व पोवाड्याचा कार्यक्रम केला जाणार होता. त्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली होती.
17 तारखेला विद्यमान लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरून बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरातच मॅरेथॉन आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केल्याची पोस्ट केली. दरम्यान 17 तारखेला रात्री सकल मराठा समाजाच्या वतीने बसस्थानक परिसरात कमान उभारण्याचे काम सुरू होते, यावेळी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी येऊन तुम्ही वेगळी जयंती साजरी करू नका महायुतीत सहभागी व्हा असे सांगितले.
त्यावर सकल मराठा समाजाने आम्ही अराजकीय जयंती साजरी करतो, याला मोठी परंपरा आहे, तुम्ही ही परंपरा खंडित करू नका असे सांगितले. त्यानंतर रात्री स्वतः आमदार तेथे आले त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करत जयंती साजरी करू नका असे सुनावले. यावरून बसस्थानकावर रात्री मोठा राडा झाल्याचेही समजले.
सकल मराठा समाज आणि विद्यमान आमदार व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचेही बघायला मिळाले. त्यानंतर या दादागिरी चा निषेध म्हणून सकल मराठा समाजाने जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेतला. सकल मराठा समाजाच्या वतीने सोशल मीडियावर महाराज आम्हाला माफ करा दहशत आणि दादागिरी मुळे आम्ही तुमची जयंती साजरी करू शकलो नाही अशा आशयाच्या पोस्ट करून झालेल्या घटनेचा निषेध नोंदविला.