पारा वाढला… दुपारी प्रचार थंडावला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : कोल्हापूर कधी नव्हे इतके तापले आहे. कोल्हापूरने एप्रिलच्या सुरुवातीलाच ४० अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे.

उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दुपारी बारापूर्वी आणि सायंकाळी चारनंतर असे प्रचाराचे नियोजन केल्याचे दिसते. दुपारचे चार तास प्रचाराला सुट्टी दिल्यासारखी स्थिती दिसून येत आहे.

इतके कडक ऊन आम्ही कधी बघितले नव्हते, असे जुनी-जाणती माणसे बोलू लागली आहेत. सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती दिसू लागली आहे. काही वर्षांपूर्वी ३५ सेल्सिअस तापमान म्हणजे शेंडीदांडी, असे कोल्हापूरचे पोषक वातावरण होते; पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगाचे तापमान वाढले, तसे कोल्हापूरही याला अपवाद ठरले नाही.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो; पण मार्च महिन्यातच तापमान वाढू लागले. आता एप्रिलच्या सुरुवातीला दुपारचे बाहेर पडणे मुश्कील होईल, असा उष्मा वाढला आहे. त्यामुळे दुपारी रस्ते सामसूम होतात.

ही परिस्थिती ग्रामीण भागांतही तशीच आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणांनी दुपारचे नियोजन थांबवल्याचे दिसते. सकाळी ७ वाजता प्रचाराला सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. दुपारी १२ पूर्वी प्रचार यंत्रणांचा पहिला टप्पा पूर्ण केला जातो. त्यानंतर दुपारी चारनंतर प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू होतो. मग रात्री दहापर्यंत प्रचार जोरात सुरू असल्याचे दिसते.

दुपारी बारा ते चारपर्यंत प्रचार थंडावल्याचे सध्या दिसत आहे. उन्हाचा तडाखा वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान संस्थांनी नुकताच व्यक्त केला आहे. याचा अर्थ या काळात प्रचार करण्याचे जाणीवपूर्वक टाळले जाईल. यापूर्वी सकाळी आणि दुपारी जाहीरसभा होत होत्या. सध्या या सभा होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

लाऊड स्पीकरद्वारे दुपारचा प्रचार

पदयात्रा, जाहीरसभा, घरोघरी संपर्क या प्रचार तंत्राला दुपारी उष्म्यामुळे मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून उमेदवारांच्या प्रचार यंत्रणांनी नामी शक्कल लढवली आहे. दुपारचे चार-पाच तास वाया जाऊ नयेत, यासाठी रिक्षा, जीपच्या माध्यमातून लाऊड स्पीकरद्वारे मतदारांना आवाहन केले जात आहे.