उद्योजकांच्‍या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल – पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदान देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय राज्‍य सरकारने घेतला होता. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्‍यामुळे जिल्‍ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान होवू शकले. केंद्र आणि राज्‍य सरकार हे शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

मंत्री विखे पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या तालुक्‍यांमध्‍ये शेतक-यांशी संवाद साधला. विविध ठिकाणी झालेल्‍या बैठकांमधून त्‍यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्‍या योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सर्वसामान्‍य माणसांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. देश आज विविध क्षेत्रात प्रगती करीत असून, देश महाशक्‍ती बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राज्‍य सरकारने शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका नेहमीच घेतली. एक रुपयात पीक विमा योजनाचे लाभ तालुक्‍यातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात मिळाला. अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना मदत म्‍हणून राज्‍य सरकारने पाच रुपये अनुदानाची योजना सुरु केली. आज जिल्‍ह्यातील बहुसंख्‍य शेतक-यांच्‍या खात्‍यात अनुदान वर्ग झाले असून, सर्व शेतक-यांना या अनुदान योजनेचा लाभ मिळेल.

जिल्‍ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी अनेक उद्योजक आता जिल्‍ह्यात येण्‍यास इच्‍छुक असून, नामवंत कंपन्‍या येणार असल्‍यामुळे तरुणांनाही संधी मिळेल. यापुर्वी धाक दडपशाहीमुळे चांगले उद्योग जिल्‍ह्यातून निघुन गेले.

ही परिस्थिती आपल्‍याला बदलायची असेल तर, उद्योजकांच्‍या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल. देशात पुन्‍हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वामध्‍ये सरकार येणार असल्‍यामुळे जिल्‍ह्याच्‍या विकासाला चांगले पाठबळ मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe