अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या हालचाली सुरु आहे. ठिकठिकाणी अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यातच नेवासे तालुक्‍यातील सहा उपकेंद्रांना मंजुरी देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. अशी माहिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. गडाख यांची नुकतीच आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी मंत्रालयात बैठक झाली.

यावेळी भेंडे आरोग्य केंद्राबाबत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला.माका येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत टोपे यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.

माका, घोगरगाव, नेवासे बुद्रुक, टोका येथे उपकेंद्रे मिळण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.दरम्यान नेवासा तालुक्‍यातील महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना तत्काळ अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध होण्यासाठी ट्रॉमा सेंटरची,

तसेच कुकाणे व सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन होऊन ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणीही मंत्री गडाख यांनी यावेळी केली. या बाबत आरोग्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

मोरे चिंचोरे, तामसवाडी येथील आरोग्य केंद्रांसाठीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नेवासे तालुक्‍यातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या दुरुस्तीस निधी उपलब्ध करण्यासाठी मंत्री गडाखांनी केलेल्या मागणीबाबत मंत्री टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले आहे.