file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-सोलापूर येथे झालेल्या रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत हरजितसिंह वधवा यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी रेल्वेच्या मुख्यालयाला प्रस्ताव 7 एप्रिल 2021 रोजी पाठविण्यात आले असल्याची माहिती दिली.

ऑनलाईन झालेल्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी प्रदीप हिरडे, अहमदनगर येथून सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा व श्रीरामपूर, लातूर, उस्मानाबाद, दौंड, गुलबर्गा, सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद, कलबुर्गी आदी ठिकाणाहून सदस्य उपस्थित होते.

अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून, प्रवाश्यांची गरज लक्षात घेऊन सदर सेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा सोलापूर विभागीय अधिकारी यांच्या वतीने सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. यावेळी नवीन तिसरा आणि चौथा प्लॅटफॉर्म जंक्शन करिता तयार करावा, ज्यामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर थांबा मिळेल.

अन्यथा त्यांना निंबळकअथवा काष्टी येथे थांबा प्राप्त होत आहे. तसेच प्लॅटफॉर्मवर नवीन एसकेलेटर (स्वयंचलित शिडी) कार्यान्वीत करण्यात यावे आणि दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर देखील नवीन एसकेलेटरची सुविधा देण्यात यावी अशी मागणी देखील या बैठकित करण्यात आली. यामुळे प्लॅटफॉर्म बदली करण्यासाठी अपंग आणि वयस्कर लोकांना त्याचा फायदा होईल. पुणे-लखनौ, पुणे-गोरखपूर या गाडयांना अहमदनगर येथे थांबा देण्याची मागणी देखील या वेळेस पुन्हा करण्यात आली.

तसेच या बैठकित अहमदनगर स्थानकावर 100 फुटी उंच उभारलेल्या पोलवर आपले राष्ट्रध्वज नेहमी फडकत रहावे अशी सूचना मांडण्यात आली. याप्रसंगी अहमदनगर शहरातून जाणार्‍या सर्व पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी वधवा यांनी केली.

यामध्ये साईनगर मुंबई फास्ट पॅसेंजर ज्याचा रूपांतर आता मेल एक्सप्रेस मध्ये झालेला आहे, पुणे-निजामाबाद, मनमाड-दौंड, नांदेड-पुणे या पॅसेंजर गाड्या समाविष्ट होत्या. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे लाईनचे काम जोमाने करण्यात यावे, अशी मागणी यावेळेस करण्यात आली. या बैठकीसाठी अहमदनगर रेल्वेचे वाणिज्य अधिकारी आर.एस. मीना व विविध सदस्य उपस्थित होते.