file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  सध्या राज्यात कोकणात अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तर दुसरीकडे इतर भागात पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील घोड कालव्याखालील लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

काही भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहेत . त्यामुळे घोड लाभक्षेत्रातील पिकांसाठी उपलब्ध पाण्यातून तातडीने आवर्तन सोडावे अशी मागणी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

यावर्षी सुरुवातीच्या काळात घोड लाभक्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला . त्यामुळे यावर्षी पाऊस भरपूर होईल व १५ ऑगस्टपर्यंत घोडसह सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा अंदाज होता. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे अंदाज चुकला व आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी संकटात सापडलेली आहेत.

जर या पिकांना तातडीने पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना जीवदान देणेकरीता धरणातील उपलब्ध पाण्यातून तातडीने आवर्तन सोडावे अशी मागणी नागवडे यांनी केली आहे.