अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी काठमोरे यांचा सत्कार केला. तसेच उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे यांची शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा देखील माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांनी सत्कार केला.

यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ, अजिंक्य झेंडे, दिलीप बोठे, बद्रीनाथ शिंदे, बोडखे, सावंत आदि शिक्षक उपस्थित होते. राज्य सरकारने पदोन्नतीचे आदेश जारी केले असून,

काठमोरे यांची औरंगाबाद येथे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून रमाकांत काठमोरे जिल्ह्याला लाभले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.

शेतमजूरांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्यापासून ते स्कॉलरशिपचा अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्याचा उपक्रम हाती घेतल्याने त्यांनी पदभार घेतल्यापासून गुणवत्तेत 10 टक्क्यांनी वाढ झाली. तर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना कला-गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे चित्रकला व काव्यांचा समावेश असलेली

पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. टाळेबंदीत ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नसलेले गरिब विद्यार्थी तसेच गावाकडे मोबाईल रेंजची समस्या असल्याने स्वाध्याय पुस्तिका वाटपाचा उपक्रम हाती घेऊन शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या हातात स्वाध्याय पुस्तिका आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकासान होण्यापासून वाचले.

या उपक्रमशील शिक्षणाधिकारी यांची पदोन्नती झाली असून, शिक्षण क्षेत्रात ते निश्‍चितच उत्कृष्ट कामगिरी बजावतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

  • अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com