Real Estate:- गुंतवणूक करणे हे भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार हा गुंतवणूक पर्यायांची निवड करताना केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील आणि मिळणारा परतावा चांगला मिळेल या दृष्टिकोनातून पर्यायांची निवड करत असतो.
गुंतवणूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बँकांच्या मुदत ठेवी, तसेच पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आणि म्युच्युअल फंड एसआयपी व ज्यांना जोखीम घेण्याची इच्छा असेल अशा व्यक्ती शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात. परंतु या व्यतिरिक्त जर गेल्या काही वर्षांपासूनचा विचार केला तर रियल इस्टेट म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आपल्याला वाढताना दिसून येत आहे.
तसे पाहायला गेले तर प्रॉपर्टी मध्ये केलेली गुंतवणूक ही फायद्याची ठरते. बरेच व्यक्ती घर तसेच दुकान किंवा फ्लॅट खरेदी करतात व कालांतराने नफा मिळाला तर ते विकतात. सामान्यपणे पाहिले तर मालमत्तेच्या किमतीमध्ये नियमितपणे वाढ होत असते.
परंतु तुम्हाला जर रियल इस्टेट अथवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल व भविष्यकाळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला अशी प्रॉपर्टी खरेदी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर नफा मिळण्याऐवजी तोटा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तेची खरेदी करत असाल तर काही मूलभूत गोष्टी पाहणे गरजेचे आहे.
प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी
1- चांगल्या ठिकाणच्या मालमत्तेची खरेदी करणे– तुम्हाला जर घर किंवा दुकान, प्लॉट खरेदी करायचा असेल तर तो योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. जर सदर मालमत्ता चांगल्या आणि योग्य ठिकाणी असेल तरच त्याच्या किमतीत काळानुरूप वाढ होत असते. एखाद्या झोपडपट्टीच्या जवळ प्रॉपर्टी खरेदी करणे टाळा.
तसेच तुम्ही अशा प्रकारचे मालमत्ता घेत असाल त्या ठिकाण पासून हॉस्पिटल, शाळा आणि बाजारपेठ यासारखे महत्त्वाची ठिकाणे किती अंतरावर आहेत याची देखील खात्री करा. तसेच तुम्हाला ज्या परिसरामध्ये अशी मालमत्ता विकत घ्यायची असेल त्या अगोदर त्या ठिकाणी रियल इस्टेट बाजारातील ट्रेंड कसा आहे म्हणजे त्या ठिकाणी तेजी आहे की मंदी इत्यादी गोष्टी पाहूनच निर्णय घ्यावा.
2- मूलभूत सुविधांची पाहणी– तसेच ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायचे असेल त्या ठिकाणी पाणी आणि विज यासारख्या महत्त्वाच्या सुविधा व त्यासोबतच सांडपाणी सारख्या सुविधांची उपलब्धता आहे का याची नक्की माहिती करून घ्यावी.
मुल आणि ज्येष्ठांसाठी आवश्यक असलेली उद्याने, शॉपिंग सेंटर, हॉस्पिटल आणि शाळा सारख्या सुविधा किती अंतरावर आहेत? हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण या सुविधांमुळे सदर मालमत्तेचे मूल्य वाढण्यामध्ये खूप मोलाची मदत होते.
3- प्रॉपर्टीचे काही वाद आहेत का हे पाहणे– तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करणार असाल त्या प्रॉपर्टीची कायदेशीर स्थिती काय आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे. म्हणजेच त्या प्रॉपर्टीचे काही कोर्टात वाद वगैरे तर सुरू नाहीत ना हे देखील पहावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आवश्यक परवानगी घेणे आवश्यक असून निर्विवाद मालमत्तेची विक्री करणे सोपे असले तरी त्याची किंमतही जास्त असते.
4- बिल्डरची प्रतिष्ठा पहावी– बिल्डरने बांधलेल्या एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर संबंधित बिल्डरची प्रतिष्ठा कशी आहे हे तपासून पहावे. नेहमी अशा प्रकारचे प्रॉपर्टी खरेदी करताना प्रसिद्ध आणि नामांकित बिल्डरांनी विकसित केलेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्येच मालमत्ता खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे.
5- गुंतवणूक करण्याआधी स्ट्रॅटेजी बनवावी– तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी अर्थात रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर ती दीर्घकालीन गुंतवणूक असते. म्हणून तुम्ही आधीच यामधून बाहेर पडण्याची स्ट्रॅटेजी तयार ठेवावी.
म्हणजेच तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करून किती वर्षांनी प्रॉपर्टी विकणार हे अगोदरच ठरवून ठेवावे. तसेच तुम्हाला तुमच्या निर्धारित केलेल्या टार्गेट अगोदर प्रॉपर्टी विकायचे असेल तर तुम्हाला होणारा संभाव्य नफा किंवा तोटा विचारात घेणे गरजेचे असते.