Mhada Lottery 2024:- आयुष्यामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की स्वतःचे घर असावे आणि ते देखील जर एखाद्या मोठ्या शहरात असले तर उत्तम. परंतु ही इच्छा जरी प्रत्येकाची असली तरी प्रत्येकालाच स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. आज जर भारतातील स्थिती बघितली तर शहरी भागच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही.
त्यामुळे कित्येक लोकांचे घर घेण्याचे स्वप्न हे फक्त स्वप्नच राहते. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्था नागरिकांना खूप मोठी मदत करतात.
आपल्याला माहित आहे की या दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरांसाठी सोडत जाहीर केली जाते व या सोडतीतून भाग्यवान विजेत्यांना परवडणाऱ्या किमतींमध्ये घर मिळू शकते. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून मुंबई असो किंवा पुणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सोडत जाहीर केल्या जातात.
अगदी याच पद्धतीने म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती व ती 8 ऑक्टोबरला काढण्यात आली होती.
या सोडतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले होते. यामध्ये बऱ्याच जणांना घराची लॉटरी तर लागली.परंतु काही उमेदवार हे प्रतीक्षा यादीत गेले. परंतु जे उमेदवार आता प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना देखील आता घर मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना मिळणार आठवड्यात घर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा यादी या आठवड्यात कार्यान्वित होणार असून या सोडतीतून परत आलेल्या 466 घरांसाठी वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून 2030 घरांसाठी सोडत 8 ऑक्टोबरला सोडत काढण्यात आलेली होती व यापैकी आठ घरे अशी आहेत की त्यांना प्रतिसादच मिळाला नव्हता.
त्यामुळे आता ही घरे पुढील सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार असून या सोडतीमध्ये काही जणांना एकापेक्षा जास्त घरे लागली होती व त्यापैकी उमेदवारांनी एका घराची निवड केली व बाकीची घरे म्हाडाला परत केली आहेत व अशी एकूण 466 घरे आहेत.
तसेच या सोडतीमध्ये बांधकाम चालू असलेल्या 1327 सदनिका होत्या व त्यापैकी 250 सदनिका म्हाडाला परत आले आहेत. 250 पैकी 19 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातील, 37 सदनिका अल्प उत्पन्न गटातील, 164 सदनिका मध्यम उत्पन्न गटातील तर 30 सदनिका उच्च उत्पन्न गटातील आहेत.
परत आलेल्या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना आता संधी दिली जाणार आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुका सुरू होत्या व त्यामध्ये म्हाडाचे अधिकारी देखील व्यस्त असल्याने ही प्रक्रिया रखडलेली होती. परंतु आता निवडणुका संपल्यामुळे लवकरच यासंबंधीची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरात लवकर प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना या आठवड्यात घर मिळण्याची शक्यता आहे.