अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लाॅकडाऊन नंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पण कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही.

त्यामुळे प्रशासनाकडून लाॅकडाऊन बद्दल अतिशय सावधगिरीने निर्णय घेण्यात येणार आहे. १ जून नंतर लाॅकडाऊन वाढणार की लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल होणार किंवा त्यामध्ये काही बदल केले जाणार याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे.

यासंदर्भात बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी असेल अशा जिल्ह्यामध्ये १ जूननंतर लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येईल.

लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये टप्पटप्प्याने शिथिलता देण्यात येणार असल्याने राज्यातील जनतेला दिलासा मिळण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.