file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय चिंतन बैठक मुंबईत पार पडली. राज्य सरकारने सारथीच्या बाबतीत काही बाबी पूर्ण केल्या त्याव्यतिरिक्त कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसून येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत आधीच्या व आताच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काय केले, याविषयी सखोल चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. चिंतन बैठकीला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर सरकारने सारथी आणि स्वायत्तता वगळता कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. 2 हजार 85 विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. याप्रकारे असे अनेक मागण्यांची पूर्तता शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही.

त्यामुळे आम्ही नाराज आहोत, असे संभाजीराजे यांनी बैठकीत सांगितले. मराठा समाजाला सरकारने सामाजिक मागास म्हणून जाहीर करावे, यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून एक प्रवर्ग तयार करून शासनाला राज्यपालांकडे जावे. राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे जावे.

342 अ कलम वापरून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे आरक्षणाचा अहवाल देऊ सरकारने द्यावे. केंद्रीय मागासवर्गीय आयोग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हा अहवाल देऊन त्यांच्याकडून माहिती सरकारला मिळू शकते, त्यांनतर हा विषय राष्ट्रपतींच्या माध्यमातून संसदेत जाऊ शकतो, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत केंद्राने, केंद्राची जबाबदारी पार पाडली पाहिजे तर राज्याने राज्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. सरकारने मराठा आरक्षणाप्रती सकारात्मक दृष्टिकोन दाखविल्यामुळे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मूक मोर्चा आंदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर दीड दोन महिने होवूनही सरकारने आश्वासनांची पूर्ती केली नाही. त्यामुळे राज्यव्यापी बैठक घेण्याचे ठरले आहे. ही बैठक पूर्वीच होणार होती. मात्र, महाराष्ट्रात आलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

सरकार मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे व गृहीत धरीत आहे. त्यामुळे, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट क्रांतिदिनी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक घेणार असल्याचेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.