file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- मुंबई पोलीस क्राईम ब्राँच सध्या पॉर्नोग्राफी प्रकरणी अतिशय बारकाईने तपास करत आहे. या प्रकरणात प्रत्येक पैलूवर त्यांनी लक्ष ठेवलं आहे.

या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पोलीस सातत्याने या प्रकरणाशी निगडित लोकांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात शर्लिन चोप्राची देखील चौकशी सुरु आहे. नुकतेच शर्लिनने या प्रकरणी एक धक्कादायक माहिती उघड केली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला तिचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत असल्याबद्दल पूर्ण कल्पना होती. मात्र, आता ते खोटे बोलत आहेत, याची मला माहिती नाही, असा धक्कादायक जबाब अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे नोंदविला असल्याचे समजते.

शर्लिनने जबाबात सांगितले आहे की, राज कुंद्राशी पहिली भेट २३ जून २०१९ रोजी डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर त्याच्याशी व त्याच्या मॅनेजरशी भेटून कामासंबंधी करार करण्यात आले. त्यानुसार मी एअरप्राइमसाठी ३ व्हिडिओ शूट केले. मात्र, हॉटशॉटसाठी एकही व्हिडिओ दिलेला नाही.

शिल्पा शेट्टीच्या स्ट्रिम कंपनीबरोबरही ३ व्हिडिओ बनविले. त्याचे मानधन आपल्याला अजूनही देण्यात आलेले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर मी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

ती मागे घेण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आणण्यात आला, त्यानंतर पॉर्न फिल्मचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती, असेही तिने जबाबात म्हटले असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्हे विभागाच्या मालमत्ता कक्षाने सुमारे ८ तास शर्लिनची कसून चौकशी केली. त्यामध्ये तिने या प्रकरणातील कुंद्राचे अनेक ‘राज’ उलगडले आहेत. तिच्या जबाबाच्या अनुषंगाने पुराव्याची पडताळणी करून आणखी काही जणांकडे चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.