file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-19 वर्षाच्या तरुणीने 67 वर्षाच्या वृद्धासोबत घरातून पळून जाऊन लग्न केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या पलवल जिल्ह्यात घडली आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल 50 वर्षांचे अंतर आहे.

या जोडप्याने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात धाव घेत नातेवाईकांपासून संरक्षण देण्यासाठी पलवल पोलिसांना निर्देश देण्याची मागणी केली. आमच्या शांततामय वैवाहिक आयुष्यात कोणीही ढवळाढवळ करू नये, अशी सुद्धा त्यांनी याचिकेत मागणी केली आहे.

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने या विवाहाचा सच्चेपणा तपासण्यासाठी स्थानिक पोलिसांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. 19 वर्षाची पत्नी आणि 67 वर्षाच्या नवऱ्याने संरक्षणाची मागणी केल्यानंतर न्यायाधीश जसगुरप्रीत सिंह यांनी विवाहाचा सच्चेपणा तपासण्याचे आदेश दिले.

सध्या या विवाहाबद्दल काही संशय निर्माण होत आहे. जबरदस्ती लग्नाची शक्यता नाकारता येत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेता, पलवलच्या पोलिस अधीक्षकांना महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेली टीम स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुलीपर्यंत पोहोचून तिची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. पलवलच्या पोलिस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या टीमला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी लागणार आहे. फक्त विवाहाचीच नाही, तर 67 वर्षीय वुद्धाच्या पार्श्वभूमीची चौकशी करण्यात येईल.

मुलीला तिची जबानी नोंदवण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याचेही निर्देश दिले आहेत. कोर्टाने सोमवारी दिलेल्या आदेशात, आठवड्याभरात तपास पथक नेमून मुलीला संरक्षण देण्याचे पलवलच्या एसपींना निर्देश दिलेत.