file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  गेल्या २-३ दिवसांपासून संपूर्ण राज्यभर पावसाचा हाहा:कार सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आलेत, अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्यात.

नुकतेच गोव्यामध्ये मंगळुरूकडून मुंबईकडे येणाऱ्या एका ट्रेनवरच दरड कोसळली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली ही गाडी सापडली आहे. कर्नाटकमधील मंगळुरू येथून मुंबईकडे येणारी ही गाडी शुक्रवारी अपघातग्रस्त झाली.

या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. रेल्वे रुळावरून उतरण्याची ही घटना दुधसागर-सोनोलिम विभागात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रेनची ओळख ०११३४ मंगळुरू जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या रूपात झाली आहे.

विशेष बाब म्हणजे चिपळूण येथे आलेल्या पुरामुळे या रेल्वेच्या मार्गात बदल करून ती मडगाव-मिरजमार्गे वळवण्यात आली होती. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसला आहे. कोकणातील विविध गावांत भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर या भूस्खलनाचा रेल्वेलाही फटका बसला आहे.