अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. यात पारनेर, संगमनेर, पाथर्डी व नगर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर अनेकजण लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पारनेर तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या गावात रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्या संख्येने होत आहेत.

पारनेर तालुक्यात मोठ्या संख्येने लग्नविधी तसेच विकासकामांच्या उद्घाटनांसाठी सुरू असलेल्या राजकीय कार्यक्रमांना नागरीकांची गर्दी होत असल्याने रूग्णांची संख्या वाढली आहे.

कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतरही तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना लसीकरण निशुल्क असल्याने नागरिक पहाटेपासूनच रूग्णालयासमोर रांगा लावत आहेत.

टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय मध्यवर्ती असल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिक या ठिकाणी लसीकरणासाठी येत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळणारे लसीचे डोस मर्यादित असल्याने लसीकरणासाठी अडचणी येत आहेत.