अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कुकाणे परिसरातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चालू गळीत हंगामातील उसाचे पेमेंट संगमनेरच्या युटेक शुगर या खासगी कारखान्याने थकवले आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांनी रविवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान आंदोलनाचा पवित्रा घेत कारखान्याच्या सरव्यवस्थापकांना प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश कर्डीले,

छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार, शंकर लिपणे, नवनाथ म्हसरूप यांनी कारखाना आवारात पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाने सोमवारी सकाळीच पेमेंट जमा करण्याचे आश्वासन दिले.

जानेवारी ते एप्रिल महिन्यात गेलेल्या ऊसाचा शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही. तालुक्यात ऊस अतिरिक्त झाल्याने शेतकऱ्यांनी या खासगी कारखान्याला ऊस दिला होता.

नांदूर शिकारी, जेऊर हैबती व परिसर ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याच्या कार्यक्षेत्र ऊसाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी ऊसाचे क्षेत्र वाढले.

त्यामुळे शेतकर्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस दिला. युटेक शुगर खाजगी साखर कारखान्यास शेतकऱ्यांनी ऊस दिला. परंतु जानेवारी ते एप्रिल महिन्यात दिलेल्या ऊसाचे पेमेंट अजूनही या कारखाना व्यवस्थापनाने जमा केलेले नाही.