महाराष्ट्राच्या लाडक्या ‘लालपरी’ चा आज ७६ वा वाढदिवस सोहळा !

Ahmednagarlive24
Published:

१ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्यानिमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. शनिवारी एसटीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला-पानाची तोरणे बांधून सजवण्यात येणार आहेत.

८७ हजार कर्मचारी व अधिकारी
गेली ७६ वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आतादेखील ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडी-अडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. त्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस राबत आहेत.

१०० टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत
केवळ ३६ बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षांत १५ हजार बसेसपर्यंत पोहोचला आहे. या बसेसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, पत्रकार अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये ३३ टक्क्यावरून १०० टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते.

प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय
याबरोबरच गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिकी यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या सोडून एसटी सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठीदेखील एसटी आपली सेवा पुरवत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात आज एसटीचा वर्धापन दिन साजरा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe