Farmer Success Story:- सध्या भारतापुढील जर आपण समस्या बघितल्या तर यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारीची समस्या ही एक गंभीर समस्या असून दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करताना आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला माहित आहे की,बेरोजगारांची संख्या आणि नोकऱ्यांची उपलब्धता हे प्रमाण खूपच एकमेकांच्या विरोधात असल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण आता वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत व यामध्ये बहुसंख्य तरुण हे शेतीमध्ये येऊन उत्तम पद्धतीने शेती देखील करत आहेत.
उच्चशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये येण्याचा एक मोठा फायदा असा झाला आहे की, शेतीमध्ये हे तरुण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत व त्यासोबत परंपरागत शेती पद्धत आणि परंपरागत पिकांना तिलांजली देत फळ पिक लागवडीवर मोठ्या प्रमाणावर भर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग सावंत यांची यशोगाथा बघितली किंवा त्यांची शेतीची पद्धत बघितली तर ती इतर तरुणांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
उच्चशिक्षित तरुण डाळिंब उत्पादनातून वर्षाला घेतो लाखोत उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा प्रामुख्याने दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात माडग्याळ हे गाव असून या गावचे रहिवासी असलेले पांडुरंग विठ्ठल सावंत हे उच्चशिक्षित असून त्यांनी कला शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ खाजगी नोकरी केली. परंतु शेती करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व गावी येण्याचे ठरवले व साधारणपणे सात वर्षांपूर्वी ते गावी आले.
गावी आल्यानंतर शेती करायचा विचार मनात आला. त्यांच्या घरच्या कुटुंबाच्या मंडळीची शेतीची पद्धत पाहिल्यानंतर त्यांना कळून आले की, पारंपरिक पिकांचे उत्पादन घेऊन हाती काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांनी आधुनिक शेती करण्याचा मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला व डाळिंब लागवड करण्याचे ठरवले.
अशा पद्धतीने केली डाळिंब लागवड
डाळिंब लागवड करण्याअगोदर त्यांनी महत्त्वाच्या कृषीसंस्था आणि कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले व संपूर्ण अभ्यास करून दोन एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्याचे ठरवले. दोन एकर डाळिंब लागवडीकरिता त्यांना 70 ते 80 हजार रुपये गुंतवणूक करावी लागली व चारशे डाळिंबाच्या रोपांची लागवड केली.
पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी कीटकनाशक फवारणी तसेच बाजारपेठेचे अचूक नियोजन व अभ्यास करून त्यांनी दुष्काळी भागात डाळिंबाची बाग फुलवली.
आज या डाळिंब बागेतून प्रत्येक वर्षाला लाखोत उत्पादन घेत असून बाजारपेठेचा अभ्यास करून बागेचे नियोजन करतात व त्या पद्धतीने उत्पादन मिळवतात. त्यामुळे त्यांना बाजारपेठेत देखील चांगला दर मिळतो व प्रति वर्षे सरासरी 13 लाखांचे उत्पन्न ते मिळवतात.