Ahilyanagar Report : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षांत बदली झाली. याबाबतचे आदेश १८ फेब्रुवारीला निघाले. सालीमठ यांच्याकडे आता साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारने ज्या ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यात सालीमठ यांचा समावेश होता. आगामी काळात नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका, आश्वी, राजूर आणि घोडेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचे मुद्दे, राहुरी कारखान्याची निवडणूक आदींची चर्चा सुरु असतानाच सालीमठ यांची बदली झाली. त्यामुळे या प्रश्नांचे काय होणार? नवे जिल्हाधिकारी कोण येणार ? हे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. याच प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न.
पुण्यात साखर आयुक्तपदावर बदली झालेले जिल्हाधिकारी सिध्दाम सालीमठ यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे सोपवला. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सालीमठ यांचा निरोप समारंभ पार पडला. दरम्यान, नगरचे नवे जिल्हाधिकारी कोण? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. दोन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी पदाची सुत्रे सालीमठ यांनी घेतली होती. 14 फेबु्रवारीला त्यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. अजून किमान एक वर्षे सालीमठ नगरला काढतील, असा अंदाज असतानाच अचानक त्यांच्या पुण्यात साखर आयुक्त पदावर बदली झाल्याचे आदेश मुंबईतून निघाले.

या आदेशानंतरही सुमारे दहा दिवस सालीमठ नगरला कार्यरत होते. आता बदली रद्द होणार असा सर्वाचा समज असताना सोमवारी सालीमठ यांनी पदाचा कार्यभार शिर्डीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर यांच्याकडे सोपवला. दरम्यान, सालीमठ यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून सोमवारी रात्रीपर्यंत आदेश निघाले नव्हते. आधी यवतामाळ याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिय यांच्यासह अन्य नावाची चर्चा होती. त्यात सोमवारी आणखी काही नावाची भर पडली असून यामुळे भाजप सरकार आता नगरला जिल्हाधिकारी म्हणून कोणाला पाठवणार यासह जिल्ह्यातील आणखी कोणाकोणाच्या बदल्या होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सिद्धाराम सालीमठ हे मुळचे सोलापूरचे असले तरी, त्यांचे शिक्षण हे राहुरीच्या कृषि विद्यापीठात झाले आहे. त्यामुळे त्यांचे नगरशी जुने नाते होते. त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात विविध योजनांमध्ये त्यांनी जिल्हा पहिल्या क्रमांकावर नेला होता. प्रशासन गतिमान व पारदर्शक करण्यासाठी त्यांनी नव्या तंत्रज्ञानावर भर दिला होता. त्यांच्यामुळेच ई-ऑफीसच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर राहिला. गौणखनिज, ई- रेकाँर्ड्स, ई- क्लुजेकोर्ट प्रणाली, जलदूत टंचाई व्यवस्थापन, भूसंपादन आदींसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर त्यांनी केला होता. शासकीय यंत्रणेला जनतेच्या दारात नेण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम त्यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात यशस्वी झाला.
सालीमठ यांची बदली तर झाली, मात्र जिल्ह्यात अनेक मह्त्त्वाचे प्रश्न शिल्लक आहेत. आगामी दोन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. शिवाय तनपुरे साखर कारखान्याची निवडणूकही आहे. याशिवाय सध्या सुरु असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्नही चर्चेत आहे. या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक आता कशी होणार, हा खरा प्रश्न आहे. नवे जिल्हाधिकारी कोण, याचीही उत्सुकता लागली आहे. महायुती सरकार नगरला खमक्या अधिकारी देणार, हे मात्र निश्चित आहे.