Ahilyanagar Report : पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या दोन वाद चांगलेच गाजत आहेत. पहिल्या वाद आहे विखे-थोरात संघर्षाचा, तर दुसरा वाद आहे विखे-लंके संघर्षाचा… या दोन्ही वादाची सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा पेटली. आहे. गुरुवारी पारनेर एमआयडीसीतील उद्योगांची तपासणी करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. या बैठकीला विखे पिता-पुत्र उपस्थित होते. ही बैठक सुरु असतानाच खा. निलेश लंके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहीत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे मुद्दामहून त्रास देत असल्याची तक्रार केली. विखे-लंके हा वाद सध्या जिल्ह्यात चांगलाच चर्चेत आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? विखे-लंके वादाचा दुसरा पार्ट नेमका काय? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळचे पारनेरचे तत्कालीन आ. निलेश लंके यांनी विद्यमान खा. सुजय विखेंना पराभूत केले. त्यापूर्वीही लंके-विखे यांच्यात सुप्त संघर्ष होताच. प्रा. राम शिंदे, विवेक कोल्हे, बाळासाहेब थोरात या विखे विरोधकांसोबत सुत जमवून लंकेंनी विखेंना थेट चॅलेंज देणं सुरु केलं होतं. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांची साथ सोडत निलेश लंके यांनी शरद पवारांचा हात धरुन लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुजय विखेंना पराभूत करुन अशक्य वाटणारा विजयही मिळवला. या निवडणुकीत निलेश लंके यांनी ६ लाख २४ हजार ७९७ मते घेतली. तर सुजय विखेंना ५ लाख ९५ हजार ८६८ मतांवर समाधान मानावे लागले होते. निलेश लंके यांचा सुमारे २८ हजारांचा हा विजय विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

त्यानंतर मात्र विखे कुटुंबाने निलेश लंकेंची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. अगदी विधानसभा निवडणुकीतही खुद्द निलेश लंके यांच्या सौभाग्यवतींना पराभूत करण्याचे कामही विखेंनी चोखपणे केले. एवढेच नाही तर, थोरातांसारखे खंदे समर्थकही विखेंनी अगदी टायमिंग साधून पराभूत केले. राणी लंके व बाळासाहेब थोरातांच्या पराभवात विखे फ्रंटफूटला राहिले. मात्र विखेंचे नशिब म्हणा, किंवा योगायोग म्हणा पण… राम शिंदे यांचा पराभव व विवेक कोल्हेंना शांत बसविण्याची किमया, या दोन्ही घटना विखेंच्या पथ्यावर पडल्याचे दिसले. या सगळ्या प्रकारामुळे निवडून येऊनही, निलेश लंके हे सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात प्रशासनाने नगर-पुणे महामार्ग, सुपे बसस्थानक, सुपे-पारनेर रस्ता या भागातील वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणे काढली. ही अतिक्रमणे लंके समर्थकांची असल्याची चर्चा झाली. विशेष म्हणजे, ऐन लोकसभेचा निकाल लागल्यावर ही कारवाई झाल्याने विखेंनीच प्रशासनाला हाताशी धरून हे केलेय, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यांत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात सुपा व पारनेर एमआयडीसीच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बैठक घेतली.
त्यावेळीही या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला. या दोन्ही एमआयडीसीतील अतिक्रमणे काढा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. आता काल म्हणजेच ६ मार्चला पुन्हा मुंबईत या दोन्ही एमआयडीसीबाबत बैठक झाली. मंत्र्यालयात झालेल्या या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पारनेरचे आ. काशिनाथ दाते, माजी खा. सुजय विखे हे उपस्थित होते. या बैठकीतही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पारनेर व सुपा औद्योगीक वसाहतीतील कंपन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. कोणत्याही धमक्यांना व तक्रारींना न घाबरता महसूल, प्रदूषण नियंत्रण व कामगार विभागाने काम करावे, असा आदेश दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
या बैठकीला खा. निलेश लंके यांनी पंतप्रधानांकडे पाठविलेल्या तक्रारींचा कदाचित संदर्भ होता. कारण कशालाही न घाबरण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यापूर्वीच निलेश लंके यांनी सुपा व पारनेर एमआयडीसीतील उद्योजकांना पालकमंत्री त्रास देत असल्याची तक्रार लंके यांनी केली होती. सुपे-पारनेर औद्योगिक वसाहतीतील स्थानिक कामगार कंत्राटदारांचे परवाणे कोणतेही ठोस कारण न देता रद्द करण्याच आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले उद्योग तसेच नव्याने सुरु होत असलेल्या उद्योजकांना विनाकारण चुकीच्या नोटीसा पाठविण्यात येऊन दबाव टाकला जात असल्याचा उल्लेख, खा. निलेश लंक यांनी पंतप्रधानांना पाठवविलेल्या पत्रात केला होता.
सुपे-पारनेर एमआयडीसीत बरंच काही अनधिकृत सुरु असल्याचं प्रशासनाचं म्हणजेच विखेंचं म्हणणं आहे. तर, येथील उद्योजकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप, निलेश लंके यांचा आहे. येत्या आठ-पंधरा दिवसांत हा प्रश्न चांगलाच चर्चेत राहणार आहे. मात्र विखे-लंके वादाचा हा दुसरा पार्ट सुरु झालाय, हे मात्र नक्की…