अहमदनगर स्थापना दिन विशेष लेख : आपले अहमदनगर @ ५३४ !

Ahmednagarlive24
Published:

 

सर्वप्रथम ऐतिहासिक अहमदनगरच्या ५३४व्या स्थापना दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा …..!!
पाचशेहुन अधिक वर्षांचा ज्ञात इतिहास असणारे, आपला स्वतःचा स्थापना दिन माहीत असणारे व तो दरवर्षी नियमितपणे आणि मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचा इतिहास अत्यंत उज्वल आहे. सीना नदीच्या काठी आणि मुळा, प्रवरा, गोदावरी या जीवनदायिनी नद्यांच्या खोऱ्यात वसलेले हे एक ऐतिहासिक महत्वाचे शहर आहे. या नद्यांच्या प्रवाहीपणामुळे या परिसरातील जीवनात चैतन्य निर्माण झाले आहे. हा पूर्ण परिसर सुजलाम, सुफलाम झाला आहे. नदीच्या काठी वसणाऱ्या ‘अहमदनगर’ या नगरीने स्वतःची संस्कृती निर्माण केली, इतिहास निर्माण केला आहे.

पाचशे चौतीस वर्षांपूर्वी अहमद निजामशहा यांनी २८ मे १४९० रोजी भिंगार जवळ सीना नदीच्या काठी स्थापन केलेल्या निजामशाहीच्या राजधानीचे शहर म्हणजे हे काना मात्र वेलांटी नसणारे अहमदनगर शहर. मध्ययुगीन जगाच्या इतिहासात कैरो आणि बगदाद या तात्कालिक जगातील सर्वात सुंदर शहरांबरोबर तुलना होणारे देखणे उद्यानाचे शहर. शहरात असणाऱ्या फरहाबक्ष महाल, चांदबीबीचा महाल ( सलाबत खानाची कबर ), हस्त बेहस्तबाग महाल, शहराचा संस्थापक अहमद निजामशहा ज्या वास्तूत चिर निद्रा घेतोय ते बागरोजा, भिंगार जवळ असणारी दमडी मस्जिद, ज्या दर्गाच्या नावावरून हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व त्यांचे बंधू शरीफजी राजे यांची नावे ठेवली ती प्रसिद्ध शहा शरीफ दर्गा, दो बोटी चिरा अश्या एक ना अनेक ऐतिहासिक वास्तू या शहराच्या गतवैभवाची साक्ष देत आजही दिमाखात उभ्या आहेत.

प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारश्यात मोलाची भर घालणारे शहर म्हणून अहमदनगर शहराची ओळख आहे. वारकरी संप्रदायाचा पाया घालणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून या भूमीची साहित्याशी नाळ जोडलेली आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात, ‘आता विश्वात्मकें देवे’ म्हणत सकला मानव जातीच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या माउलींनी याच भूमीतल्या नेवासा येथे पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची रचना केली. साईबाबांनी याच भूमीतून ‘श्रद्धा आणि सबुरीचा’ सल्ला दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच…!!’ अशी सिंह गर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी याच मातीतून केली आणि स्वातंत्र्य चळवळीत प्राण फुंकले. तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुलेंना स्त्री शिक्षणाची प्रेरणा देणारी भूमीही हीच होय. इथल्याच भुईकोट किल्ल्यात ४२ च्या चले जावं चळवळीतील पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल,मौलाना अबुल कलाम आझाद आदी राष्ट्रीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्याच वेळी पंडितजींनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ अर्थात भारत एक खोज या भारताच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाचे लेखन केले.

साधू संतांची जशी ही भूमी आहे तसेच देशभक्त महापुरुषांची ही भूमी आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती करत असतांना ज्या ‘गनिमी काव्याचा’ प्रभावी वापर केला त्या गनिमी काव्याचा पहिला प्रयोग स्वराज्य संकल्पक शहाजी राजेंनी इथल्याच ‘भातोडीच्या लढाईत’ केला. पाच लाखाची फौज घेऊन मराठ्यांचे स्वराज्य नामशेष करायला दख्खनेत समक्ष उतरलेल्या मुघल बादशहा औरंगजेबने चिवट महाराष्ट्रापुढे याच ठिकाणी आलमगीरला देह ठेवला. स्वतंत्रपूर्व काळात कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज इथल्याच भुईकोट किल्ल्यात इंग्रजांकडून मारले गेले, त्यांची समाधी आजही आम्हा नगरकरांना त्यागाची, बलिदानाची, राष्ट्रभक्तीची सदैव प्रेरणा देत असते. सहकाराची देणं महाराष्ट्राला आणि भारताला देणारा हा जिल्हा. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आजही प्रवरानगर येथे दिमाखात उभा आहे…!!

जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचे जगप्रसिद्ध साईबाबा संस्थांना शिर्डी ही याच ऐतिहासिक भूमीत आहे. जगभरातून लाखो भाविक दरवर्षी बाबांच्या समाधी मंदिराला भेट देऊन नवी ऊर्जा, श्रद्धा प्राप्त करतात. तर ,
निलांजन समाभासं रविपुत्रम यमाग्रजम,
छाया मार्तंड संभुतंम तं नमामि शनैश्चरंम

अशी सूर्यपुत्राची आराधना करायला देशविदेशातून भाविक घराला दार नसलेल्या शनी महाराजांच्या पावन अशा शिंगणापूर गावात येतात. अठ्ठावीस वर्षे घोंगडीवर बसून आपल्या राज्याचा आदर्श कारभार करून नारीशक्तीचा वस्तुपाठ जगासमोर ठेवणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ही याच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गावातील. इथल्याच मातीने, पाण्याने त्यांचे भरणपोषण असे केली की जगाला एक आदर्श रणरागिणी, राज्यकर्ता मिळाली.

अष्टविनायक गणपतीपैकी एक असणारा कर्जत तालुक्यातील सिद्धटेकचा सिध्दीविनायक आपली कृपादृष्टी सर्वांवर धरून आहे तर तेव्हाच पाथर्डीतील मोहटादेवी आणि मढीचे कानिफनाथ मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे तसेच पाथर्डीमधील भगवानबाबा गड हे देखील जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. नगर तालुक्यातील मठपिंप्री या गावात बाराव्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी वास्तव्य करून हजारो अनुयायींना उपदेश केले.त्याच वेळी पद्मभूषण अण्णा हजारे यांचे राळेगण सिध्दी आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार म्हणजे जलसंधारण आणि ग्रामविकासाचे मॉडेल आणि प्रेरणास्थान. वंचित शोषित घटकांना, महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कामात डॉ गिरीश कुलकर्णींच्या स्नेहालयने आज जगात ठसा उमटवला आहे. तर डॉ धामणे पती पत्नीच्या मनोविकास प्रकल्पांची जगाने दखल घेतली आहे. ही सर्व ही धार्मिक नसली तरी सामाजिक तीर्थक्षेत्रेच. यांनी ही नगरच्या वैभवात भरच घातली आहे.

नुकताच भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, त्यापूर्वी १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना इथल्याच महावीर कला दालनात भारतातील प्रसिद्ध चित्रकार, मूर्तिकार प्रमोद कांबळे यांनी भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या पुराण काळातील ऋषीमुनींपासून ते आधुनिक काळातील राष्ट्रीय अदर्शांचे ‘सारे जहा से अच्छा…!!’ हे पेन्सिल ने काढलेले भितीचीत्र आवर्जून पाहायलाच हवे असे आहे. फराहबक्ष महालाच्या जवळचा आशिया खंडातील एकमेव असलेला टँक म्युझियम आणि तिथे असलेला दुसऱ्या महायुद्धातील पॅटर्न टँक नाही पाहिला तर मग तुम्ही काय पाहिलं? या शिवाय अमहादनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, आनंद ऋषींच्या जन्माने पावन झालेले चिचोंडी तर पदस्पर्शाने पावन झालेले आनंदधाम, अलीकडेच उभा राहिलेला देखणा उड्डाण पूल आणि त्याच्या खांबावरील युगपुरुष, शककर्ता छत्रपती शिवरायांचा जीवनपट , हे सगळ काही अलौकिक, अद्भुत, अवर्णनीय….!!

मित्रहो, या सर्व बाबी अहमदनगरच्या भूषण आहेत. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय या अहमदनगर स्थापना दिनाच्या शुभेच्छाना अर्थ प्राप्त होणार नाही. आज भुतलावरच्या या अद्भुत शहराच्या स्थपनादिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व सृजनशील, रसिक, इतिहास प्रेमींचा मेळावा या अहमदनगर नगरीत भरला आहे. निमित्ताने आमच्या ऐतिहासिक अहमदनगर नगरीत दाखल झालेल्या तमाम बांधवांनो आणि भगिनींनो, काय आहे तुमच्या अहमदनगरमध्ये असा विचार न करता वेळ मिळेल तेव्हा आणि तसे अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वैभवाच्या या खुणांना आवश्य प्रत्यक्ष भेट द्या आणि आनंद घ्या ……!!

श्रीनिवास एल्लाराम
मो. 9421200139