ATM Card Insurance:- ज्या कुणाचे बँकेमध्ये खाते असते अशा प्रत्येक व्यक्तीकडे एटीएम कार्ड असतेच. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपल्याला रोख रकमेची गरज भासते तेव्हा प्रामुख्याने एटीएम कार्डचा वापर करून आपण पैसे काढत असतो. तसेच आपल्याला काही खरेदी करायची असेल तरी त्यावेळेस आपण बिल देताना एटीएम चा वापर करून सहज समोरच्याचे बिल पेड करत असतो.
परंतु एटीएम कार्डच्या या वापरांव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या सुविधा देखील आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु आपल्याला या गोष्टींची माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ घेण्यापासून बरेच लोक वंचित राहतात.

एटीएम कार्डच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हप्ता न भरता विम्याचा लाभ दिला जातो. जेव्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला एटीएम कार्ड जारी केले जाते तेव्हाच एटीएम कार्ड धारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. परंतु ही गोष्ट अजून देखील बऱ्याच लोकांना माहिती नाही व त्यासंबंधीचेच माहिती आपण या लेखात घेऊ.
एटीएम कार्डवर मिळतो मोफत विमा
यामध्ये जर तुम्ही कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधी करिता वापरले असेल तर तुम्ही मोफत विमा सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या विमा सुविधेमध्ये अपघात आणि जीवन विमा या दोन्हींचा समावेश आहे. यामध्ये तुमच्या कार्डच्या श्रेणीनुसार रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोल्ड एटीएम कार्डधारकांना चार लाख रुपये( हवाई मृत्यू), दोन लाख रुपये( नॉन इयर) कव्हर देण्यात येते तर प्रीमियम कार्ड धारकाला दहा लाख( हवाई मृत्यू) तर पाच लाख( नॉन एअर) कव्हर देण्यात येते. त्यासोबतच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेसह अनेक बँका त्यांच्या डेबिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर देतात.
काही डेबिट कार्ड तीन कोटी रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण देतात. या प्रकारचे विमा संरक्षण संपूर्णपणे मोफत दिले जाते व महत्त्वाचे म्हणजे बँकेकडून कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे मागितले जात नाहीत.
केव्हा मिळतो एटीएम कार्डच्या माध्यमातून विम्याचा लाभ?
एटीएम कार्डच्या माध्यमातून विम्याचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा त्या कार्डद्वारे ठराविक कालावधीत काही व्यवहार केले जातात. यामध्ये वेगवेगळ्या कारणांकरिता हा कालावधी बदलू शकतो.
काही एटीएम कार्डावर विमा पॉलिसी सक्रिय करण्यासाठी एटीएम कार्ड धारकाने किमान 30 दिवसातून एकदा व्यवहार करणे आवश्यक आहे. तसेच काही एटीएम कार्ड धारकांना विमा संरक्षण सक्रिय करण्यासाठी शेवटच्या 90 दिवसात एक व्यवहार करावा लागतो.