कोणत्याही व्यक्तीला यश एका रात्रीत मिळत नसते. यशाच्या शिखराला स्पर्श करण्यासाठी अनंत समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच सगळ्या परिस्थितीला तोंड देत असताना जिद्द आणि धैर्याने उभे राहून यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सगळे आवश्यक प्रयत्न करावे लागतात. तसेच नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्य या जोरावर व्यक्ती यशस्वी होत असतो.
भारतातील जर आपण अनेक उद्योजक पाहिले तर त्यातील बरेच उद्योजक हे वडिलोपार्जित श्रीमंत नव्हते. अगदी शून्यातून सुरुवात करून मेहनतीच्या जोरावर ते आज यशस्वी ठरले आहेत व भारतातच नाही तर जगात देखील अनेकांनी नावलौकिक मिळवलेला आहे. फक्त अशा व्यक्तींनी एक स्वप्न पाहिले व या स्वप्नाचा पाठलाग करत असताना मात्र न थकता अविरत कष्ट घेतले व ते आज यशस्वी झाले.
अगदी याच मुद्द्याला साजेशी यशोगाथा पाहिली तर ती कर्नाटक राज्यातील बेल्लारी या गावी जन्मलेले शंकर यांचे घेता येईल. अगदी ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाहाला सुरुवात करणाऱ्या या व्यक्तीने अखंड कष्ट करून कार्बोनेटेड पेय क्षेत्रामध्ये बिंदू फीज जिरा मसाला ब्रँड लोकप्रिय केला असून आज त्यांची कंपनी ही 800 कोटींपर्यंत झालेली आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते 800 कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रवास
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्नाटक राज्यातील बेल्लारे या गावी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये शंकर यांचा जन्म झाला व घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांचे बालपण देखील खूप संघर्षांनी भरलेले होते. साहजिकच आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले व त्यामुळे नोकरी करणे दुरापास्त झाले.
परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी मात्र व्यक्तीला काहीतरी करावेच लागते व त्या पद्धतीनेच उदरनिर्वाहासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले व ऑटो रिक्षा विकत घेऊन ती शहरात चालवायला सुरुवात केली. ऑटो रिक्षा चालवत असताना त्यांनी खूप मेहनत घेतली व एकाच वर्षात रिक्षाचे सर्व कर्ज देखील फेडले व त्या माध्यमातून काही पैशांची बचत करून ऑटो रिक्षा विकली आणि टॅक्सी विकत घेतली.
नंतर टॅक्सीच्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. परंतु मात्र या व्यवसायात ते समाधानी न होते व काहीतरी वेगळे करावेही ही इच्छा त्यांच्या मनात होती व त्यामुळे त्यांनी 1987 या वर्षी ऑटोमोबाईल गॅरेज व्यवसाय मध्ये प्रवेश केला व टायर डीलरशिप आणि ऑटोमोबाईल फायनान्स कंपनीची स्थापना केली.
हळूहळू या व्यवसायामध्ये जम बसू लागला व आयुष्यामध्ये चांगले बदल घडायला लागले. परंतु यावर देखील समाधान न मानता याही पुढे काहीतरी करावे म्हणून 2000 यावर्षी ते उत्तर भारतामध्ये प्रवास करत असताना त्यांना या माध्यमातून एक पेय बनवावे अशी कल्पना सुचली व यातूनच 2002 मध्ये बिंदू फीज जिरा मसाला त्यांनी लॉन्च केला. त्यांच्या या जीरा मसाल्याच्या चवीने लोकांची लक्ष वेधले व हे पेय अल्पावधीत लोकप्रिय झाले.
अशा पद्धतीने केली त्यांच्या कंपनीने वाटचाल
2002 मध्ये बिंदू फीज जिरा मसाला लॉन्च केला व 2005-06 मध्ये त्यांच्या कंपनीची उलाढाल एकूण सहा कोटी रुपयांची झाली. त्यानंतर 2010 मध्ये एसजी कार्पोरेटच्या उत्पादन ब्रँड फिझ जीरा मसालाने प्रचंड वाढ केली व कंपनीची उलाढाल 100 कोटींची झाली. या सगळ्या प्रवासामध्ये भारतातील पेय उद्योगांमध्ये बिंदू फीज जिरा मसाला हा ब्रँड खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला एवढेच नाही तर विदेशात निर्यातीपर्यंत मजल मारली.
2015 मध्ये सिंगापूर, यूएई आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये या ब्रँडची निर्यात चालू झाली व 2023 मध्ये या कंपनीचे मूल्य आठशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.
अशाप्रकारे शंकर यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की व्यक्तीकडे काय आहे यापेक्षा जे आहे त्यातून अखंड कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर व्यक्तीला यशाचे शिखर गाठता येते हे आपल्याला दिसून येते.