सध्या मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन एखादी गोष्ट खरेदी करणे याकडे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेंड वाढल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आता कर्जाची प्रक्रिया देखील अतिशय सुलभ आणि सोपी झाल्यामुळे तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने लोकं अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकरिता उठ सुट कर्ज घेताना आपल्याला दिसून येतात.
तसेच सुलभपणे कर्ज मिळत असल्याने आता अनेक प्रकारच्या वाईट अशा आर्थिक सवयी देखील व्यक्तीला लागण्याची शक्यता वाढते व व्यक्ती कर्जाच्या चक्रामध्ये अडकतो. यामध्ये प्रामुख्याने तीन सवयी अशा आहेत की त्या मुख्यत्वे व्यक्तीला कर्जाच्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे अशा सवयी पटकन सोडणे किंवा त्यापासून मुक्त होणे खूप गरजेचे आहे.
या सवयी व्यक्तीला अडकवतात कर्जाच्या जाळ्यात
1- अनावश्यक जास्तीचा खर्च– बऱ्याच जणांची एक समस्या असते की काही गोष्टींमध्ये नको त्या ठिकाणी किंवा नको तितका खर्च करण्याची सवय असते. ही सवय इतकी वाईट आहे की यामुळे अनेक जण कर्जाच्या विळख्यात अडकतात. बऱ्याच वेळा अनावश्यक वस्तूंवर असा खर्च केला जातो. साधारणपणे उंच जीवनशैली किंवा सामाजिक प्रतिष्ठा, स्वतःच्या आर्थिक मर्यादा स्पष्टपणे न कळणे इत्यादीमुळे ही सवय लागते व व्यक्ती कर्जाच्या जाळ्यात अडकतो.
2- अमर्याद खरेदी– बऱ्याचदा एखादी वस्तू खरेदी करताना त्याचे कुठलेही पूर्वनियोजन केले जात नाही व तरी खरेदी केली जातात. ही सवय प्रामुख्याने तणाव किंवा आनंदासारखे भावना किंवा विक्री व सवलती यासारख्या गोष्टींमुळे निर्माण होते व यामुळे देखील व्यक्ती कर्जाच्या जाळ्यात अडकतो.
3- क्रेडिट कार्डचा वापर– सध्या क्रेडिट कार्डचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु याचे योग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. क्रेडिट कार्डचे जर व्यवस्थापन योग्य प्रकारे केले गेले नाही तर जास्त व्याज भरावे लागते व त्यामुळे कर्जाचा बोजा वाढू शकतो. तसेच दैनंदिन खर्च करिता क्रेडिट कार्डचा जर नियमितपणे वापर केला तर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किती खर्च होत आहे याचा हिशोब ठेवणे कठीण होते व त्यामुळे कर्ज वाढत जाते.
काय कराल उपाययोजना?
अनावश्य खर्च टाळायचा असेल तर तुमचे येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचे तपशीलवार नियोजन करणे गरजेचे आहे. यावरून तुम्ही अनावश्यक व जास्त खर्च जर करत असाल तर ते आपल्याला कळते. तसेच तुम्ही एखादी वस्तू जर खरेदी करत असाल तर त्या वस्तूची गरज किती आहे किंवा संबंधित वस्तू खरेदी करण्यामागे इच्छा किती आहे या पद्धतीने वर्गीकरण करावे. परंतु कुठलीही वस्तू खरेदी करताना इच्छेपेक्षा गरजेला प्राधान्य द्या.
अमर्याद खरेदी करण्याची सवय सोडण्यासाठी तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची नसेल किंवा असा विचार नसेल तर एखादी वस्तू खरेदी करण्या अगोदर तुम्ही ठराविक कालावधीपर्यंत वाट पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या वस्तूची खरच तुम्हाला गरज आहे की फक्त इच्छा आहे हे कळते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वस्तूची विक्री आणि विशेष ऑफर इत्यादीला प्रोत्साहन देणारे मार्केटिंग ईमेल आणि न्यूज लेटर चे सबस्क्रिप्शन असेल तर ते बंद करा. यामुळे या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात येणाऱ्या प्रलोभनांपासून तुमची आपोआप सुटका होते.
क्रेडिट कार्ड कर्जावर कशी कराल मात?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या होणाऱ्या खर्चावर जर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे असेल तर दैनंदिन व्यवहारांकरिता तुम्ही डेबिट कार्ड किंवा रोख पद्धतीने व्यवहार करा. त्यामुळे आपण आपल्याकडे असलेले पैसेच खर्च करतो आणि कर्ज होण्यापासून वाचतो.
तसंच क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर खर्च केलेली संपूर्ण रक्कम प्रत्येक महिन्याला भरण्याचा प्रयत्न करा व त्यामुळे तुम्ही व्याज टाळू शकतात. तसेच एखादा अनपेक्षित खर्च जर उद्भवला तर तो करता यावा म्हणून आपत्कालीन निधीची तरतूद करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही एखादी खरेदी ईएमआय वर करत असाल तर व्यवस्थित विचार करूनच पाऊल उचला. जरी ईएमआय वर एखाद्या वस्तूची खरेदी सोपी आणि सुलभ वाटत असेल तरीदेखील तिचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केले नाही तर कर्जाच्या विळख्यात व्यक्ती अडकण्याची शक्यता असते.