माणसाच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट पूर्णत्वास नेण्याची जिद्द असेल आणि ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न जर जोरदार असतील तर त्या व्यक्तीला यश हे हमखास मिळते. आपल्याला काहीतरी करायचे आहे व आपण जे काही ठरवले आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळवायचेच या एकाच उद्देशाने जर व्यक्ती काम करायला लागला तर कुठल्याही विपरीत परिस्थितीतून व्यक्ती मार्ग काढते व यशाच्या शिखराकडे वाटचाल करते व यशस्वी देखील होते.
ही बाब किंवा हा मुद्दा आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राला लागू होतो व तसा तो कृषी क्षेत्राला देखील लागू होतो. याच पद्धतीने जर आपण नाशिक जिल्ह्यातील बागलाण म्हणजे सटाणा तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी डाळिंब शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

असे पाहायला गेले तर कळवण, बागलाण म्हणजे सटाणा, देवळा आणि मालेगाव पट्ट्यामध्ये डाळिंब शेती मोठ्या प्रमाणावर होते. याच सटाणा म्हणजेच बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने पाणीटंचाईवर मात करत अडीच महिने डाळिंबा बागेला टँकरच्या माध्यमातून विकतचे पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली व ही बाग फुलवली. याच बागेतून त्यांनी 22 लाखांचे उत्पन्न घेत यश मिळवलेले आहे.
संदीप देसले यांनी मिळवले डाळिंबापासून 22 लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बागलाण तालुक्यातील गोराडे ग्रामपंचायतचे सदस्य असलेले अल्पभूधारक तरुण शेतकरी संदीप शांताराम देसले या तरुण शेतकऱ्याने पाणी टंचाई कालावधीत अडीच महिने विकतचे पाणी घेतले व टँकरच्या माध्यमातून त्या पाण्याचा पुरवठा 600 झाडांची त्यांच्या शेतात असलेल्या डाळिंबाच्या बागेला केला व त्यातून डाळिंबाची बाग फुलवली.
या बागेतून त्यांना आज 22 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. एवढेच नाहीतर त्यांनी डाळिंबावर आलेल्या तेल्या व मर रोगाला आळा घालण्यासाठी देखील योग्य नियोजन केले व जिद्द तसेच चिकाटी ठेवून काम केल्याने त्यांना हे यश मिळालेले आहे.
संदीप शांताराम देसले यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये साधारणपणे सहाशे भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे व त्याचे संगोपन करीत 22 लाख रुपये मिळवलेले आहेत.
मिळवले तेरा टन डाळिंबाचे उत्पन्न
विपरीत नैसर्गिक संकटांना तोंड देत संदीप देसले यांनी तीन वर्षांपूर्वी डाळिंबाच्या भगव्या जातीची लागवड केलेली होती व 21 मार्च 2024 रोजी बागेचा बहर धरला होता. बागेतील फळवाढीस आली तर एकीकडे विहीर कोरडी पडली.हाता तोंडाशी आलेले डाळिंबाचे उत्पादन वाया जाईल की काय अशी वेळ त्यांच्यावर आलेली होती.
परंतु या विपरीत परिस्थितीत न हारता त्यांनी पाणी विकत घेऊन बागेला द्यायचा निर्णय घेतला व बाग वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याकरिता पाच किलोमीटर अंतरावरून एका टँकर साठी चारशे रुपये याप्रमाणे खर्च त्यांनी केला व अडीच महिने दररोज पाण्याचे टँकर डाळिंब बागेला दिले व डाळिंबाचा बाग वाचवण्यासाठी अथक परिश्रम केले.
संदीप देसले यांच्या या प्रयत्नांना नियतीने देखील साथ दिली व 12 सप्टेंबर रोजी देसले यांच्या डाळिंबाच्या झाडांचा 170 रुपये किलो दराने व्यवहार झाला व त्यातून त्यांना 13 टन उत्पादन मिळून 22 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न हाती लागले.