Chicken Breed:- भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वपार पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय पाहिला तर अगोदर परसबागेतील कुक्कुटपालन ही संकल्पना खूप मोठी होती व प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी देशी कोंबड्या पाळल्या जात असल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून यायचे.
परंतु आता परसातील कुक्कुटपालन ही संकल्पना जरा मागे पडली आहे व या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाने शिरकाव केल्याने आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय केला जात आहे. तसेच अनेक कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून अनेक देशी कोंबड्यांच्या जाती विकसित करण्यात आल्यामुळे देखील याचा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होताना आपल्याला दिसून येत आहे.
कारण कुक्कुटपालन हा व्यवसाय अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. यामध्ये जर आपण कोंबड्यांच्या प्रजातींचा विचार केला तर भारतात अनेक देशी प्रजातीच्या कोंबड्या आहेत व त्या प्रत्येक प्रजातीच्या कोंबड्यांचे वेगवेगळे असे वैशिष्ट्य आहेत. या सगळ्यामध्ये आता झारखंड येथील बिरसा कृषी विद्यापीठाने एक देशी कोंबडीची जात विकसित केली असून ती नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
बिरसा कृषी विद्यापीठाने विकसित केली झारसीम कोंबडी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्यांना फायदा व्हावा व या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळावे या दृष्टिकोनातून झारखंड राज्यातील बिरसा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एक देशी कोंबडीची जात विकसित करण्यात आलेली आहे व तिचे नाव झारसिम असे आहे. एक कोंबडी वर्षाला सरासरी 170 अंडी देण्यास सक्षम आहे.
या कोंबडीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर देशी कोंबड्याच्या तुलनेमध्ये ही कोंबडी दुप्पट मोठ्या आकाराचे अंडे देते व साधारणपणे जन्म झाल्यानंतर 180 दिवसातच अंड्याचे उत्पादन सुरू होते. तसेच इतर देशी कोंबड्यांच्या जातींच्या तुलनेत झारसिम कोंबडी वर्षाला सरासरी 165 ते 170 अंडी देण्यास सक्षम आहे.
वजनाच्या बाबतीत ही कोंबडी इतर देशी कोंबडीच्या तुलनेमध्ये दुप्पट वजनाची असते. या मागील प्रमुख कारण म्हणजे या कोंबडीच्या अंड्यांचा आकार हा सामान्य कोंबडीच्या अंड्याच्या आकाराच्या तुलनेत खूप मोठा असतो यामुळेच तिचे वजन देखील जास्त असते. जर आपण एका अंड्याचे वजन पाहिले तर ते 50 ते 55 ग्रॅम पर्यंत असते.
त्या तुलनेत मात्र इतर देशी कोंबड्यांच्या अंड्यांचे वजन 30 ग्रॅमच्या आसपासच असते. वजन वाढण्याचा वेग पाहिला तर तीन महिन्यांमध्ये तिचे वजन दीड किलोपर्यंत होते. तिचा रंग हा आकर्षक आणि बहुरंगी असतो व तिचा जीवन काळ देखील जास्त दिवसांचा आहे. या कोंबडीचे मांस उत्पादन जास्त आहे व अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे नक्कीच झारसिम कोंबडी ही शेतकऱ्यांसाठी कोंबडी पालनात खूप फायद्याची ठरेल हे मात्र निश्चित.