मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा आंदोलनाची धग भेटली होती व त्यासोबतच लोकसभा निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला. परंतु राज्य शासनाने या कायद्याच्या माध्यमातून जे काही आरक्षण लागू केले त्या आधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या.
त्यामुळे या आरक्षणाचा लाभापासून अनेक विद्यार्थी मुकण्याची शक्यता होती. परंतु आता याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी पुन्हा नव्याने शुद्धिपत्रक जाहीर करण्यात आले आहे व त्या माध्यमातून आता ज्या उमेदवारांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना त्या नोंदीच्या आधारे इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी जात प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना आता नवीन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
कुणबी नोंदी सापडलेल्यांना आता ओबीसी मध्ये मिळणार नोकरी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता पुन्हा शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी जात प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना नवीन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे व त्यामुळे आता सहा जुलैला होणारी पूर्व परीक्षा 29 जुलैला होणार आहे.
राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचा आधार घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला होता. परंतु या माध्यमातून जे काही आरक्षण लागू झाले ते लागू होण्याआधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक नोकरीसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.
परंतु आता या जाहिरातींमध्ये एसीईबीसी आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येत आहे व याचाच भाग म्हणून आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी नवीन शुद्धिपत्रक काढण्यात आले व त्यामध्ये एसईबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे. 29 डिसेंबर 2023 च्या जाहिराती मध्ये आता 250 जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
या निर्णयामुळे काय होईल फायदा?
या निर्णयामुळे आता मराठा समाजातील उमेदवारांना मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ मिळणार आहे व या माध्यमातून वयोमर्यादा ओलांडली गेली असेल तरी देखील आता नव्याने अर्ज करता येणार आहे.
यामध्ये कुणबी नोंदणीच्या आधारे ओबीसीचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे काही उमेदवारांनी नमूद केले होते व त्या माध्यमातून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी इतर मागास प्रवर्गाचा पर्याय सादर करण्याची विनंती केली होती व त्यानुसार आता 28 मे रोजी राज्य शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागासवर्गाची जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांचा ओबीसीचा दावा मान्य करून सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे साहजिकच अशा विद्यार्थ्यांना आता ओबीसी करिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ मिळणार आहे.