Poultry Farming:- आजकाल शेती सोबत जे जोडधंदे केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने पशुपालन व्यवसायासोबत शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यातल्या त्यात जे तरुण आता शेती क्षेत्राकडे वळत आहे ते मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजेच पोल्ट्री फार्मिंगकडे त्यांचा कल दिसून येतो.
कारण या दोन्ही व्यवसायांमध्ये खर्च कमी आणि नफा जास्त मिळतो. पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये देशी कोंबडीचे पालन देखील आता मोठ्या प्रमाणावर केले जाते. देशी कोंबडीचे पालन प्रामुख्याने अंडी उत्पादन व मांस उत्पादनासाठी प्रामुख्याने करतात.
देशी कोंबड्यांच्या अनेक जाती आता विकसित करण्यात आलेले आहेत व यातील बऱ्याच जाती या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये चांगला आर्थिक नफा देऊ शकतील अशा प्रकारचे आहेत.
त्यामुळे तुम्हाला देखील देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकरिता नर्मदा निधी या देशी कोंबडीचे पालन खूप फायद्याचे ठरू शकणार आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण कोंबडी असून कडकनाथ कोंबडीला एक कडवी टक्कर देणारी ही जात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
नर्मदा निधी आहे जास्त पैसा देणारी देशी कोंबडीची जात
कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नर्मदा निधी ही देशी कोंबडीची जात सर्वात फायदेशीर आहे व या जातीची कोंबडी ही कडकनाथ कोंबडी सारखी आहे. जर आपण नर्मदा निधी या देशी कोंबडीची माहिती बघितली तर ही स्थानिक कोंबड्यांपेक्षा अधिक वेगाने वाढते व जास्त प्रमाणात अंडी उत्पादन देते.
तसेच या कोंबडीचे पालन केले तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला पैसा मिळण्यास सुरुवात होते. इतर देशी कोंबडींच्या जातींच्या तुलनेमध्ये अंडी आणि मांस उत्पादनामध्ये नर्मदा निधी ही जात उत्तम मानली जाते. या कोंबड्यांचे अंडी उत्पादन जास्त प्रमाणात असून नर्मदा निधी कोंबडीचे मांस खायला चविष्ट असल्याने त्याची मागणी जास्त आहे.
आपण या कोंबडीचे वजन वाढण्याचा कालावधी बघितला तर ती 140 दिवसांमध्ये दीड किलोपर्यंत पोहोचते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नर्मदा निधी या कोंबडीचे मांस खूप फायद्याचे आहे.
कारण या मांसामध्ये लोह आणि प्रथिने यांचे प्रमाण उत्तम आहे व चरबी देखील कमी आहे. त्यामुळे याचे सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम शरीरावर होत नाही व त्यामुळे याला मागणी जास्त आहे.
तसेच या कोंबडीच्या जातीचे मांस आणि अंडी कुपोषणासारख्या समस्येवर देखील फायदेशीर आहेत व नियमित सेवन केल्यास कुपोषणासारखे आजार देखील बरे होतात.
इतर स्थानिक जातींच्या देशी कोंबड्यांच्या तुलनेमध्ये या कोंबड्यांच्या अंडी उत्पादन क्षमता देखील जास्त आहे. साधारणपणे एक वर्षाच्या कालावधीत 150 अंडी उत्पादन नर्मदा निधी कोंबडीच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे अंडी विक्रीतून देखील पोल्ट्री उत्पादकांना चांगला पैसा मिळतो व कमीत कमी वेळेत चांगला नफा मिळवून व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो.