शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही पिकांची लागवड केली जाते त्या पिकांची लागवडीच्या पद्धती पासून तर त्यांची काढणी इत्यादी बाबतीत आपल्याला वेगळेपण दिसून येते. तसेच लागवडीपासून काढणीस येण्याचा जो काही वेळ असतो तो देखील वेगवेगळा असतो. फळबागांच्या अनुषंगाने जर बघितले तर त्यांच्या लागवडीपासून तर मिळणाऱ्या उत्पादनापर्यंतचा कालावधी हा साधारणपणे काही वर्षांचा असतो.
त्यासोबतच कापूस किंवा सोयाबीन तसेच मका सारख्या इतर पारंपारिक पिकांचा लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा कालावधी हा काही महिन्यांचा असतो. परंतु जर आपण पालेभाज्या बघितल्या जसे की,कोथिंबीर, मेथी तसेच पालक इत्यादी पालेभाज्यांचा लागवड ते काढणीपर्यंतचा कालावधी हा अगदी दीड ते दोन महिन्यांचा असतो.

या अनुषंगाने कोथिंबिरी सारखी पालेभाजी ही अगदी कमीत कमी वेळेमध्ये काढणीस येते व बऱ्याचदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न देऊन जाते. त्यामुळे बरेच शेतकरी कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळवण्याच्या अपेक्षेने कोथिंबिरीची लागवड करतात. या हंगामामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अनेक भाजीपाला पिकांची आवक कमी झालेली आहे.
जास्तीच्या पावसाने भाजीपाला उत्पादनात घट येऊन बऱ्याच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे व याला कोथिंबीर देखील अपवाद नाही. कोथिंबिरीला मोठ्या प्रमाणावर सध्या दर मिळताना आपल्याला दिसून येत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना देखील कोथिंबीर लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत आहे व अशाच प्रकारचे आर्थिक उपन्न हे शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा या गावचे शेतकरी बाळासाहेब करपे यांना मिळाले आहे. 50 गुंठ्यात केलेल्या कोथिंबीर लागवडीतून त्यांना तब्बल लखपती बनवलेले आहे.
कोथिंबीर लागवडीतून मिळाले साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब करपे यांनी यावर्षी 50 गुंठ्यामध्ये कोथिंबिरीची लागवड केलेली होती. साधारणपणे बाळासाहेबांनी त्यांच्या कुटुंबांच्या मदतीने ऑगस्ट महिन्यामध्ये 50 गुंठे क्षेत्रामध्ये वीस किलो अशोका जातीचे कोथिंबीर बियाणे म्हणजेच धन्याची पेरणी केली व या सगळ्या कोथिंबिरीचे नियोजन करण्याकरिता त्यांनी स्प्रिंकलर पद्धतीचा वापर केलेला होता.
जेव्हा कोथिंबीर ही काढणीस आली तेव्हा मंचर येथील सद्गुरु व्हेजिटेबल कंपनीचे मालक आदेश पोखरकर, गणेश शिंदे तसेच सोमनाथ काटकर या व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावर येऊन त्या कोथिंबीरीचे दर ठरवले. विशेष म्हणजे बाळासाहेब करपे यांच्या कोथिंबिरीला सर्वांच्च असा दर मिळाल्यामुळे त्या कोथिंबिरीच्या माध्यमातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.
बाळासाहेबांनी लावलेल्या 50 गुंठ्यातील कोथिंबीरीने त्यांना चक्क साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले असल्याने या शेतकऱ्याने आनंदोत्सव साजरा केला व चक्क शेतातच गुलाल उधळला.
अशाप्रकारे केले कोथिंबिरीचे नियोजन
जेव्हा त्यांनी कोथिंबीर लागवड करण्याचे ठरवले त्याआधी पूर्व मशागत करताना 50 गुंठे क्षेत्रामध्ये दोन ट्रॉली कोंबडी खत टाकले. कोथिंबीर लागवड केल्यानंतर गरज पाहून तीन औषधाच्या फवारण्या देखील घेतल्या. कोथिंबिरीचे बियाणे विकत घेण्यापासून तर पूर्व मशागत व इतर खर्च मिळून त्यांना चाळीस हजार रुपये लागले.
विशेष म्हणजे या कोथिंबीरीला स्प्रिंकलर च्या साह्याने योग्य पाणी व्यवस्थापन केले. या सगळ्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांना एकाच महिन्यात कोथिंबिरीच्या 15000 जुड्यांचे उत्पादन मिळाले. कमीत कमी खर्च व योग्य व्यवस्थापन म्हणून त्यांनी कमी वेळेत कोथिंबिरीचे भरघोस उत्पादन घेऊन आठ लाख रुपये या माध्यमातून मिळवलेले आहेत.
यावरून आपल्याला दिसून येते की जर कमी वेळेत येणाऱ्या पिकांची लागवड केली व त्या कालावधीत जर चांगला दर मिळाला तर शेतकरी कमी वेळेत देखील लाखोत उत्पन्न घेऊ शकतात. याकरिता फक्त बाजारपेठेची मागणी आणि परिस्थिती लक्षात घेऊन अशा प्रकारच्या पिकांची लागवड करणे गरजेचे आहे.