Cardamom Cultivation:- वेलची त्यालाच आपण वेलदोडे असे देखील म्हणतो. प्रत्येक घरामध्ये सकाळी चहामध्ये वापर करण्यापासून तर अनेक प्रकारच्या भाज्यांमध्ये देखील वेलचीचा वापर केला जातो. मुखशुद्धीकरणाकरिता आणि मसाला म्हणून देखील वेलची वापरली जाते. वेलचीचे दर पाहिले तर ते महाग आहेत.
परंतु तरी देखील दैनंदिन वापरामध्ये वेलचीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेष म्हणजे आता शेतकरी देखील वेलचीची शेती करण्याचे प्रयोग करू लागलेली आहेत. भारतामध्ये प्रामुख्याने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेलचीची लागवड केली जाते. ज्याप्रमाणे केळीच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता व उबदार हवामान लागते अगदी त्याचप्रमाणे वेलची लागवडीकरिता देखील जास्त पाणी आणि उबदार हवामानाची आवश्यकता असते.
वेलची च्या जातींची माहिती घेतली तर यामध्ये हिरवी वेलची आणि काळी वेलची असे प्रामुख्याने दोन प्रकार येतात. यामध्ये हिरव्या वेलचीला छोटी वेलची असे म्हणतात व हिचा वापर अनेक प्रकारच्या अन्नामध्ये केला जातो. तसेच काळी वेलचीला मोठी वेलची असे देखील म्हणतात. मसाला म्हणून मोठी वेलची जास्त प्रमाणात वापरली जाते.
अशी ही महत्वपूर्ण वेलची तुम्ही तुमच्या घराच्या बागेमध्ये सुद्धा यशस्वीपणे लागवड करू शकतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही की घरामध्ये देखील आपण वेलचीची रोपे लावू शकतो. परंतु त्याकरता आपल्याला काही गोष्टींची अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते. घराच्या बागेमध्ये किंवा घराच्या परिसरात वेलची लागवड कशी करावी व त्याकरिता कोणती काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
वेलची लागवडीसाठी लागणारे साहित्य
घरच्या बगीच्या मध्ये किंवा गच्चीवर तुम्हाला वेलची लागवड करायची असेल तर त्याकरिता भांडे तसेच बियाणे, आवश्यक खते, वेलची साठी लागणारी आवश्यक माती आणि पाणी इत्यादी गोष्टींची आवश्यकता भासते.
अशा पद्धतीने कराल पूर्वतयारी
मिरचीची लागवड करण्याआधी वेलचीच्या बिया काढून घेणे गरजेचे असते व त्या बियांना पाण्यात ठेवावे. पाण्यात ठेवल्यानंतर कपड्याच्या साह्याने सर्व पाणी गाळून घ्यावे व बिया या कॉटनच्या सुक्या कपड्यांमध्ये व्यवस्थित पुसून घ्याव्यात. यानंतर तुम्ही वेलची बियांची लागवड करणे फायद्याचे ठरेल.
या पद्धती लागवडीसाठी ठरतील फायद्याच्या
वेलची लागवड करण्यासाठी सगळ्यात अगोदर भांड्यामध्ये किंवा यासाठी तुम्ही कंटेनर चा वापर करू शकतात. त्यासाठी भांडे किंवा कंटेनर मध्ये 50% कोकोपीट खत म्हणजेच याकरता नारळाचा भुसा आणि 50% गांडूळ खत टाकावे. यामुळे वेलचीच्या झाडांची वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते व मुळे मजबूत राहतात.
त्यानंतर वेलचीच्या बिया जमिनीमध्ये टाकून त्यांना व्यवस्थित दाबून घ्यावे व थोडे पाणी घालावे. पाणी देताना मात्र ते एका वेळी जास्त प्रमाणात देऊ नये. पाणी व्यवस्थापन करताना भांड्यामध्ये जेव्हा माती सुकलेली वाटते तेव्हाच थोडे थोडे पाणी द्यावे. प्रत्येक दिवशी पाणी देऊ नये. एकदा रोपाची उगवण झाल्यानंतर ते वाढायला लागते व या कालावधीत त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
वेलची उगवल्यानंतर कोणती विशेष काळजी घ्यावी?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी देणे खूप गरजेचे आहे परंतु ते देताना एकाच वेळी देऊ नये. जर वेलचीच्या रोपाला किंवा झाडाला जास्त प्रमाणात एकाच वेळी पाणी दिले गेले तर झाडाची मुळे खराब होण्याची शक्यता वाढते. हिवाळ्याचा कालावधी असेल तर जास्त पाणी देऊच नाही. भांड्यातील मातीचा ओलावा पाहून पाण्याचे व्यवस्थापन करावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भांडे ठेवताना त्या ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचेल अशा ठिकाणी भांडे ठेवावे. वेलची रोपाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उष्ण तापमान असले तर त्याची वाढ चांगली होते.
कोणत्या ऋतूत वेलचीची लागवड ठरेल फायद्याची?
वेलचीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चांगल्या वाढीसाठी 15 ते 35 अंश सेंटीग्रेड दरम्यान तापमान लागते. या तापमानामध्ये वेलचीच्या बियांची उगवण देखील चांगली होते. त्यामुळे जर उन्हाळ्याच्या हंगामामध्ये वेलचीची लागवड केली तर तुम्हाला फायद्याचे ठरेल. परंतु वेलचीच्या रोपावर किंवा झाडावर तीव्र स्वरूपाचा सूर्यप्रकाश येणार नाही याची देखील काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतली तर वेलचीची लागवड घरच्या बगीच्यात देखील यशस्वी करू शकतात.