Career Information:- सध्या दहावी आणि बारावीचे निकाल लागले असून अनेक वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी ऍडमिशन घेण्याच्या धावपळीत सध्या दिसून येत आहेत.आता अगोदर सारखे विद्यार्थी बारावी झाल्यानंतर लगेच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश न घेता विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना जास्त प्रमाणात प्रवेश घेताना दिसून येतात.
भारतातील जर आपण अनेक क्षेत्र पाहिले तर तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अनेक कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे व त्या दृष्टिकोनातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना खूप महत्त्व आहे. याशिवाय आपण जर भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार आणि विकास पाहिला तर तो खूप वेगाने होत असल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या क्षेत्रासाठी तज्ञ मनुष्यबळाची खूप मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.
या क्षेत्रामध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत व यापुढे त्यामध्ये वाढ होईल. या सगळ्या मनुष्यबळामध्ये जर आपण पायलट चा विचार केला तर यांची गरज येणाऱ्या कालावधीत जास्त प्रमाणात भासणार आहे व विशेष म्हणजे उत्कृष्ट पायलट असलेल्या व्यक्तींना विमानसेवा कंपन्यांच्या माध्यमातून चांगल्या करिअरची संधी पटकन मिळू शकते. त्यामुळे आपण या लेखात पायलट होण्यासाठी काय करावे लागते किंवा कुठला अभ्यासक्रम यासाठी महत्त्वाचा आहे? याची माहिती घेणार आहोत.
ही प्रशिक्षण संस्था आहे महत्त्वाची
हवाई क्षेत्रामध्ये जर करिअर करायचे असेल तर या दृष्टिकोनातून भारत सरकारने सुरू केलेली इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी ही शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी संस्था खूप महत्त्वाची असून या संस्थेकडे जागतिक दर्जाची अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध आहे.
पायलट होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम
1- कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स– ॲब इनिशिओ टू कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स या नावाने या संस्थेचा अभ्यासक्रम ओळखला जातो. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून यामध्ये जमिनीवरील आणि हवेतील ऍक्टिव्हिटीज यांची प्रत्यक्षपणे ट्रेनिंग दिली जाते. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कमर्शियल पायलट लायसन्स मिळते. यास अभ्यासक्रमाच्या कालावधीमध्ये विविध इंजिन क्षमता आणि प्रकार असलेली विमाने हाताळता येतात.
किती लागते प्रशिक्षण शुल्क?
या अभ्यासक्रमाकरिता असणारी फी ही एक लाख रुपयांमध्ये आहे. तसेच याशिवाय अभ्यासाचे साहित्य, नेव्हिगेशन कॅम्पुटर तसेच गणवेश, हेडफोन, परीक्षा आणि पायलट परवाना फी यासारख्या बाबींसाठी दोन लाख रुपये भरणे गरजेचे असते. महत्वाचे म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गटातील सात उमेदवारांचा खर्च प्रायोजित केला जातो.
पायलट होण्यासाठी आवश्यक पात्रता
ज्या कोणाला हा अभ्यासक्रम करायचा असेल अशा खुल्या संवर्गातील विद्यार्थी हे बारावी विज्ञान परीक्षेमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये सरासरी 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्के गुण मिळणे गरजेचे आहे.
कशी केली जाते निवड?
या अभ्यासक्रमासाठी निवड होण्याकरिता देशातील विविध केंद्रांवर चाळणी परीक्षा होते. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रात पुणे आणि नागपूर व मुंबई या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. ही परीक्षा ऑनलाईन होते व या ऑनलाईन पेपर मध्ये सामान्य इंग्रजी, गणित तसेच भौतिकशास्त्र, रिझनिंग कार्यकारण भाव व चालू घडामोडी इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जातात.
महत्त्वाचे म्हणजे या पेपरचा बेस हा बारावीचा असतो. बहुपर्यायी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न यामध्ये असतात. लेखी परीक्षेच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाते व या मेरिट लिस्टमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती या संस्थेच्या रायबरेली येथील कॅम्पसमध्ये घेतल्या जातात.
मुलाखत झाल्यानंतर पुढे काय?
मुलाखत झाल्यानंतर निवडक विद्यार्थ्यांना पायलट एट्टीट्यूड टेस्ट आणि सायकोमेट्रीक चाचणीसाठी बोलावले जाते व या चाचणीमध्ये राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट मिळत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
किती लागते चाळणी परीक्षेसाठी फी?
चाळणी परीक्षेसाठी खुला संवर्ग व इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये इतके शुल्क भरावे लागते. तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही.