Cotton Cultivation:- खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात कपाशी पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. प्रामुख्याने खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर महाराष्ट्रात सोयाबीन आणि कपाशी लागवड खूप मोठ्या क्षेत्रावर होते. यामध्ये जर आपण कपाशी पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर साधारणपणे ठिबक सिंचनावर कपाशी लागवड केली जाते.
तसे पाहायला गेले तर प्रत्येक भागानुसार कपाशी लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये मातीचा प्रकार तसेच पाण्याची उपलब्धता इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो. परंतु या सगळ्या पद्धतींमध्ये जर आपण परभणी जिल्ह्यातील देठणा या गावचे श्रीरंग देवबा लाड यांचे लागवड तंत्रज्ञान पाहिले तर ते विशेष फायद्याचे ठरेल अशा प्रकारचे आहे. श्रीरंग देवबा लाड हे भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताच्या संघटक असून त्यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान दादा लाड कापूस तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते.
काय आहे कपाशी लागवडी संदर्भात दादा लाड तंत्रज्ञान?
दादा लाड यांच्या तंत्रज्ञानामध्ये कपाशीचे लागवड करताना योग्य अंतर आणि गरजेनुसार संतुलित खतांचा वापर इत्यादी गोष्टींना खूप महत्त्व आहे व त्यासोबतच झाडाची उंची कमी ठेवण्याची शिफारस व त्याकरता झाडाचे गळफांदी कापणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे त्यांच्या या तंत्रज्ञानाला नवी दिल्ली येथील आयसीएआर म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषदेने देखील मान्यता दिलेली आहे.
साधारणपणे गळफांदी कापून झाडाचा शेंडा खुडून बोंडांचे वजन वाढवून घेऊन उत्पादनामध्ये वाढ मिळवण्याच्या तंत्रज्ञानाला दादा लाड तंत्रज्ञान म्हणतात. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने मध्यम ते खोल काळ्या जमिनीसाठी फायदेशीर मानले जाते.
लागवडीच्या कालावधी असतो यामध्ये महत्त्वाचा
जेव्हा मृग नक्षत्राचा पुरेसा पाऊस पडतो म्हणजे जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागवड जितके लवकर शक्य आहे तितक्या लवकर करावी. कारण जर लागवड उशिरा केली तर उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असते.
लागवडीसाठी हे अंतर वापरावे
कापसाची लागवड ही 90 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर एका जागी एक बी अशा पद्धतीने करावी. अशा पद्धतीने जर लागवड केली तर साधारणपणे एका एकर मध्ये 14814 इतकी झाडांची संख्या राहते. एका एकर मध्ये झाडांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच उत्पादनामध्ये देखील वाढ होते. पेरणी करण्यासाठी जर न्यूमॅटिक पेरणी यंत्राचा वापर केला तर एक बी योग्य खोलीवर म्हणजेच पाच ते सहा सेंटीमीटर खोलीवर सोडले जाते व बियाणे देखील कमी लागते.
रोपे एक समान राहतात व उगवण देखील जोमदार होते. न्यूमॅटिक पेरणी यंत्र नसेल तर मार्किंग केलेली दोरी किंवा गुंटरची साखळी, दोन रोपांमधील अंतराच्या लांबीच्या काड्या इत्यादीचा वापर करून हाताने टोकन करता येते.
जर आपण जमिनीुसार लागवडीच्या शिफारशी पाहिल्या तर यामध्ये मध्यम खोल काळी जमिनीमध्ये लागवड अंतर 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर तसेच मध्यम घनता लागवड प्रणालीचा अवलंब केला जाऊ शकतो. झाडांची संख्या यामध्ये एकरी 14814 पर्यंत राहते.
झाडांची गळफांदी कापणे
कापसाचे झाड पाहिले तर यावर दोन प्रकारच्या फांद्या असतात त्यातील एक गळफांदी व दुसरी फळफांदी असते. यातील सुरुवातीच्या कालावधीत गळफांदी येते व एका झाडावर गळ फांद्या तीन किंवा चार या प्रमाणात असतात. या फांद्या वाढीकरिता मुख्य झाडाची स्पर्धा करतात व झाडाला जे काही आपण खत देतो त्यातील 70 टक्के खत गळफांद्या घेतात.
गळ फांद्यानंतर झाडाला फळ फांद्या येतात व त्या जमिनीला समांतर आडव्या वाढतात. या फांद्यांची जाडी वाढत नाही व खोडाकडून आलेले अन्नरस बोंडाला देतात. ज्या प्रमाणामध्ये अन्न रस मिळतो तेवढ्या प्रमाणामध्ये फळ फांद्यांवर बोंडे लागतात व बोंडांचे पोषण होऊन बोंडे वजनदार येतात. परंतु गळफांदी वेगाने वाढते व बोंड्यांची संख्या व वजन देखील त्यामुळे कमी होते.
यामध्ये प्रामुख्याने लागवडीनंतर 85 ते 90 दिवसानंतर किंवा कापसाच्या झाडाची उंची तीन फूट झाल्यावर झाडाचा मुख्य शेंडा खुडावा व यामुळे झाडाची उंची मर्यादित राहते व शाकीय वाढ जास्त होते.
बोंडे भरायला व बोंडातील कापसाचे वजन वाढायला यामुळे मदत होते. या सगळ्या तंत्रज्ञानाचा निष्कर्ष पाहिला तर गळफांदी कापल्यावर बोंडाच्या वजनामध्ये तीन ग्रॅम वरून सहा ग्रॅम पर्यंत वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे तसेच बोंडाचे वजन एक ग्रॅम वाढले तर एकरमध्ये तब्बल तीन क्विंटल जास्त कापूस येतो. गळ फांदी काढल्यावर एका बोंडाच्या वजनात सरासरी सात ग्रॅम पर्यंत वाढ होते.
गळफांदी कापा परंतु ही काळजी घ्या
गळफांदी कापायच्या अगोदर तुम्हाला फळफांदी व गळफांदी नेमकी कोणती आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे एका झाडावर तीन किंवा चार गळफांद्या असतात व ही फांदी खोडाच्या अगदी सुरुवातीला लागून किंवा खोडाला समांतर वाढते. त्या उलट फळफांद्या या जमिनीला समांतर वाढतात. साधारणपणे गळफांदी ही लागवड केल्यानंतर 40 दिवसांनी ओळखता येते.
कालावधीत या फांद्यांवर पाने व शेंडांवर काही प्रमाणामध्ये पाते लागल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे फांदी अचूकपणे ओळखून खोडापासून एक इंच अंतरावर धारदार कटरच्या साह्याने कापावी. तसेच गळफांदी कापताना खोडाची साल निघू नये किंवा झाडाला इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. तसेच शेंडा खुडताना झाडाची उंची तीन फूट झालेली आहे याची खात्री करावी व त्यानंतरच सहा इंच लांबीचा शेंडा कटरच्या साह्याने कापावा.
तसेच गळफांदी कापताना व शेंडे खुडताना कोरडे वातावरण असणे गरजेचे आहे. कारण ढगाळ किंवा पावसाळी वातावरण असेल तर ज्या ठिकाणी गळफांदी कापलेली असेल त्या ठिकाणी बुरशी वाढू शकते.
तसेच फळफांदीच्या खालच्या बाजूला एक लांब दांडीचे व आकाराने मोठे पान असते व या पानावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे हे पान देखील काढून टाकावे. झाडात जर दाटी करणाऱ्या काही हिरव्या फांद्या किंवा पाते,पाने असतील तर ते कटरने कापून टाकावे. जर बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला तर बुरशीनाशकाची फवारणी करावी.