Agri Technology: फळबाग लागवडीसाठी उपयुक्त ठरेल ‘सीआरए’ तंत्रज्ञान! कमी पाण्यात तयार होईल सशक्त व निरोगी फळझाड

Ajay Patil
Published:
CRA technology

Agri Technology:- शेती क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे शेतकरी कमीत कमी पाण्यात व कमीत कमी क्षेत्रात देखील लाखोंचे उत्पादन मिळवू लागले आहेत. आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करतात व फळबाग तसेच भाजीपाला लागवडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान देखील वापरतात.

अशा तंत्रज्ञान वापरामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले जाते. अशाच प्रकारे जर आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितले तर क्लायमेट रेसिलीयंट एग्रीकल्चर म्हणजे सीआरए हे तंत्रज्ञान फळबाग लागवडीसाठी खूप उपयुक्त असून बारामती तालुक्यात असलेल्या कऱ्हाटी येथे फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड प्रात्यक्षिक देखील आयोजित करण्यात आलेले होते. हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून याचा वापर करून रोपांची लागवड केली तर दुष्काळी परिस्थिती देखील फळबाग जगवणे शक्य होणार आहे.

 कसे आहे सीआरए तंत्रज्ञानाचे स्वरूप?

या तंत्रज्ञानामध्ये फळबाग लागवड करण्याआधी शेतामध्ये तीन फूट लांब, तीन फूट रुंद तसेच तीन फूट खोल खड्डा केला जातो व या खड्ड्याच्या चार कोपऱ्यांवर चार इंच व्यासाचे तीन फूट लांब असलेले पाईप उभे केले जातात. नंतर मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून हा खड्डा शेणखत तसेच पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व मातीचे मिश्रण आणि दीड फूट पर्यंत भरला जातो.

त्या ठिकाणी फळझाड लावून भरलेला खड्डा मातीने भरून घेतला जातो. त्यानंतर खड्ड्यात जे काही पाईप उभे केलेले असतात त्यामध्ये दीड फूट खडी  व दीड फूट जागेमध्ये जमीन पातळीपर्यंत वाळू भरावी लागते. हे केल्यानंतर ते पाईप हळुवारपणे वर ओढून बाहेर काढले जातात.

पाईप काढले गेल्यामुळे चारही कोपऱ्यांमध्ये वाळूचा दीड फूट खोलीचा कॉलम तयार होतो व त्यानंतर रोपांना जे काही पाणी दिले जाते ते प्रथम चार कॉलम मध्ये शोषले जाते. पाण्याचे शोषण होऊन कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपायला सुरुवात होते व अशा प्रकारे फळझाडांच्या मुळाच्या परिसरात ताबडतोब ओलावा मिळण्यास मदत होते व सिंचनाची कार्यक्षमता वाढून पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

मोकाट पाणी म्हणजेच पाट पाण्याच्या सिंचनापेक्षा या प्रकारामध्ये खूप कमी पाणी लागून पाण्याची बचत देखील होते व खड्ड्यात टाकलेल्या शेणखतामुळे पाणी देखील धरून ठेवले जाते व मुळाना अन्नद्रव्य देखील मिळतात. या सगळ्यामुळे फळझाडांच्या रोपांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते व निरोगी तसेच सशक्त झाड निर्माण होण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe